Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

मीरेचे व्यक्तिमत्त्व सहज सोपे पण कारुण्याने भरलेले : डॉ. राधा मंगेशकर


पुणे : मीरेचे व्यक्तिमत्त्व सहज सोपे असले तरी ते कारुण्याने भरलेले आहे, त्यामुळे तिचे पूर्ण व्यक्तिमत्त्व समजणे अवघड आहे. संत सूरदासांचे तत्त्वज्ञान समजायला सहज सोपे आहे. तर कबीरांचे तत्त्वज्ञान कळायला क्लिष्ट आहे कारण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश समाजसुधारणा, सामाजिक चळवळ असा होता. त्यामुळे जीवनात विविध अनुभव आल्यानंतरच कबीर कळायला लागतो, असे प्रतिपादन डॉ. राधा मंगेशकर यांनी केले.
संत मीराबाई, संत सूरदास आणि संत कबीर यांचा इतिहास, व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, भाषाशैली, भक्तिभाव आणि तत्त्वज्ञानाची ओळख करून देणाऱ्या डॉ. राधा मंगेशकर लिखित ‌‘कहें… मीरा सूर कबीरा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी पूना गेस्ट हाऊस येथे झाले. त्या वेळी आयोजित संवादात्मक कार्यक्रमात डॉ. मंगेशकर बोलत होत्या. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित,  डॉ. माधवी वैद्य,  शेफ विष्णू मनोहर,  डॉ. मिलिंद भोई, किशोर सरपोतदार, प्रकाशक मंदार जोगळेकर, ऋतुजा फुलकर यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘कहें… मीरा सूर कबीरा’ याच्या ई-बुक आवृत्तीचे प्रकाशनही या प्रसंगी झाले. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, महेकच्या मनिषा निश्चल, गायक इकबाल दरबार यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. राधा मंगेशकर म्हणाल्या, संत मीराबाई, संत सूरदास आणि संत कबीर यांच्या रचनांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले तर भारतरत्न लता मंगेशकर यांनी या रचना गाऊन अजरामर केल्या. परंतु काळाच्या ओघात त्या विस्मरणात गेल्या आहेत. यामुळे या तीन संतांच्या साहित्यकृतींवर आधारित अभ्यासपूर्ण कार्यक्रम सादर करत होते. परंतु आजच्या पिढीला हा वैचारिक कार्यक्रम पेलला नाही. हा ठेवा कायमस्वरूपी संग्रही राहिल या भूमिकेमुळे संतांविषयीचे विचार पुस्तकरूपात आणले. या संतांच्या साहित्यावर अभ्यास करण्यासाठी मी त्या काळातील संस्कृतीचा अभ्यास, संशोधन, भारताचा इतिहास या विषयी खोलवर जाणून घेतले. संत साहित्याचा अभ्यास करताना प्राचीन सांस्कृतिक संदर्भ, समाजव्यवस्था याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केले. या पुस्तकातून मांडल्या गेलेल्या भावांपैकी कलाकार म्हणून मला शांतभाव नक्कीच आवडतो तसेच दास्य आणि वात्सल्यभावही सुंदर आहेत. हे भाव व्यक्तींच्या भावभावनांना समजून घेणारे आहेत परंतु मधुराभक्ती मात्र समजून घेण्यास क्लिष्ट आहे. कारण यात ईश्वर आणि भक्ताला प्रियकर आणि प्रेयसीच्या रुपात मांडले जाते. या भावाचा आध्यात्मिक स्तर उच्च आहे. संतांविषयी अभ्यास करताना मी अतिशय समृद्ध झाले अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
भविष्यात कोणत्या भूमिकेत रसिकांसमोर येणार या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. राधा मंगेशकर म्हणाल्या, प्रयोगशील गायिका म्हणून मी नक्कीच काम करणार नाही, कारण आजच्या पिढीची मानसिकता डोके बाजूला ठेवून फक्त मनोरंजन हवे अशी आहे आणि माझ्या संकल्पनांना, प्रयोगांना समजून घेण्याकरिता डोके वापरावे लागते. कार्यक्रमाची सांगता करताना त्यांनी संत मीराबाई यांचे ‌‘माई माई कैसे जियूँ री’ हे भजन सादर केले.
डॉ. राजा दीक्षित यांनी लेखिका डॉ. राधा मंगेशकर म्हणून तुमचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जाणवते तसेच अभ्यासपूर्ण वृत्तीही लक्षात येते असे गौरवोद्गार काढले. डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, डॉ. मंगेशकर यांचे लिखाण अतिशय साधे, सोपे, सरळ, सर्वसामान्यांना समजणारे आहे. अशा स्वरूपाचे लिखाण करणे अवघड असते.
प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन इंद्रायणी दीक्षित यांनी केले. ऋतुजा फुलकर आणि मान्यवरांनी डॉ. राधा मंगेशकर यांना बोलते केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading