Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

“जेवढी अदानी-अंबानींच्या मताला, तेवढीच माझ्या खेड्यापाड्यातील लोकांच्या मताला किमंत”, सुनील तटकरे

 

रायगड : अनंत गीते यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी काम केले. भारत सरकारने ज्या योजना केल्या त्या योजनांचे काम त्यांच्याकडे होते परंतु मतदारसंघातील एकाही महिलेला रोजगार दिला नाही. असं म्हणत सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनंत गिते यांच्यावर जोरदार घणाघात चढवला. महाड विधानसभा मतदारसंघातील बिरवाडी येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलतांना तटकरे म्हणाले की, अदिती तटकरे हिच्या महिला बालविकास मंत्रालयाकडून ‘लेक माझी लाडकी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर घटू शकतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने हा घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होणार यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे राज्यसरकारच्या योजना आमदार भरतशेठ गोगावले हे मतदारसंघात देतीलच, परंतु भारत सरकारच्या जितक्या योजना असतील त्या मोठ्या प्रमाणात मतदारसंघात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असाही शब्दही यावेळी तटकरे यांनी मतदारांना दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य लोकांची कामे करणे हे आपले उत्तरदायित्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही दिली. खेड्यापाड्यातील लोकांना मतांचा अधिकार दिला. अदानी- अंबानी यांच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत माझ्या खेड्यापाड्यातील लोकांच्या मतांना आहे ही ताकद संविधानाने दिली आहे. असं म्हणत येत्या दि. १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दिनांक ७ मे रोजी मतदान करताना घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करा असे आवाहन देखील त्यांनी केले.

दरम्यान, या जाहीर सभेला शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा नेते विकास गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष निकम, निलिमा घोसाळकर, नितीन पावले आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading