Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

जिद्द, चिकाटी, चपळाईमुळे जिंदादिल राजीव जालनापूरकर यांनी गाठली यशाची शिखरे : डॉ. पी. डी. पाटील

पुणे : मल्लखांब या क्रीडा प्रकारामुळे जिद्द, चिकाटी, चपळाई आणि चिवटपणा हे गुण राजीव जालनापूरकर यांच्यात आले. याच गुणांमुळे त्यांनी यशाची शिखरे गाठली आहेत. यातूनच रामोजी फिल्म सिटीला नावारूपाला आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. एका जिंदादिल मराठी माणसाच्या कार्यकर्तृत्वामुळे ही किमया घडली असून तेथे बहुसंख्य मराठी लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या फिल्म सिटीला भेट देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रामोजी फिल्मसिटीचे संचालक व सीईओ, थीम पार्क ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव जालनापूरकर यांना रविवारी जिंदादिल पुरस्कार डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी जिंदादिल पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे 26वे वर्ष आहे. शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर व्यासपीठावर होते.

उत्तम दूरदृष्टी लाभलेल्या राजीव जालनापूरकर यांच्या संकल्पनेतून भारतात अनेक ठिकाणी थिमपार्क, ॲम्युजमेंट पार्क निर्माण होत आहेत ज्यातून भारताच्या अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होत आहे, असे डॉ. पी. डी. पाटील म्हणाले.

राजीव जालनापूरकर हे आधुनिक विश्वातील विश्वकर्मा आहेत, असे गौरवाने नमूद करून प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, अमूर्ताला मूर्त रूप देणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. रामोजी फिल्म सिटी ही भारतीयांच्या कल्पकतेचे उत्तम उदाहरण आहे. मराठी माणसाचा कोतेपणा, संकुचित वृत्ती ही ओळख विसरायला लावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच राजीव जालनापूरकर होत. भारतीयांमध्ये असलेल्या अफाट कल्पकता आणि सर्जनशिलतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास भारतात प्रतिसृष्टी निर्माण होऊ शकते.

सचिन इटकर म्हणाले, जिंदादिल पुरस्कारामुळे राष्ट्रकार्याचा विचार पुढे नेणाऱ्या जालनापूरकर यांचा यथोचित सन्मान होत आहे. आधुनिक काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्रात अर्थव्यवस्थेचे स्थान मोठे आहे. यातूनच राज्या-राज्यात अनेक थिमपार्कस्‌‍ची निर्मिती होत आहे. अशा स्वरूपाच्या उपक्रमांमध्ये रोजगार निर्मितीची मोठी संधी उपलब्ध होत असून या क्षेत्रातील देशाचे नेतृत्व म्हणजे राजीव जालनापूरकर होत. जिंदादिल व्यक्तीने जिंदादिल व्यक्तीच्या हस्ते जिंदादिल व्यक्तीस दिलेला हा पुरस्कार आहे.

सत्काराला उत्तर देताना राजीव जालनापूरकर म्हणाले, पुण्याने व पुण्यातील सहकाऱ्यांनी मला घडविले. त्यांचे आभार मानण्याची जिंदादिल पुरस्कार ही संधी आहे. मल्लखांबासाठी वापरला जाणारा लाकडाचा खांब हे माझ्यासाठी दैवत ठरले असे सांगून ते पुढे म्हणाले, मल्लखांबाच्या टोकावर गेलो ते परत खाली आलोच नाही. भारतातील सांस्कृतिक व पौराणिक विषयांवर आधारित थिम पार्कस्‌‍ची निर्मिती करून भारताच्या सांस्कृतिक वैभावाची ओळख जगाला करून द्यावी, असा मानस आहे. ऐतिहासिक, पौराणिक, क्रीडा, पर्यटन ही क्षेत्रे हातात हात घालून जात असतात आणि एकमेकांना पूरक ठरतात.

सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी रंगत-संगत प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली आणि पुरस्कारामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading