fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपकडून माजी महापौर आणि प्रदेश भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असून मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त ६ आणि ७ एप्रिल रोजी ‘घर चलो अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जवळपास दहा ते बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन भाजपकडून आखण्यात आला आहे. या अभियानात भाजपाचे १० हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. 

६ एप्रिलला भाजपचा ४४ वा वर्धापन दिन असून या दिवशी पुणे शहर भाजपकडून मोहोळ यांच्या प्रचारासाठी ३ लाख घरांमध्ये विशेष संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सर्व आमदार यांच्यासह १० हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार असल्याचे घाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे लोकसभा निवडणूक प्रभारी श्रीनाथ भिमाले,सरचिटणीस पुनीत जोशी, रवी साळेगावकर, राजू शिळमकर,राघवेंद्र बापू मानकर,संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, हरीश परदेशी, पुष्कर तुळजापूरकर यांच्या सह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत ”अब की बार ४०० पार” ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार केला आहे, असेही घाटे यांनी सांगितले.

घाटे म्हणाले, विधानसभा स्तरावर पक्षाच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच पन्ना प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहेत. मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य आहे.

मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर, वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपा चा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला अशा समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील, अशी माहितीही घाटे यांनी दिली. मोदी सरकारचे कार्य व योजना पोहोचवून भाजपा ला मत देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर रहाणा-या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल असे घाटे यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात पुणे शहर भाजपच्या विविध आघाड्या आणि मोर्चे यांच्या बैठका झाल्या. महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, व्यापारी आघाडी, मंडल अध्यक्ष, विस्तारक सोशल मीडिया आणि आयटी सेल, अनुसूचित जाती मोर्चा, झोपडपट्टी आघाडी, वैद्यकीय आघाडी, पर्यावरण आघाडी, उत्तर व दक्षिण भारतीय आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, सहकार, पायाभूत सुविधा, शिक्षक भटके विमुक्त आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. तसेच, पदाधिकाऱ्यांच्या सूचना देखील जाणून घेतल्याचे घाटे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading