जैव अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात पुणेस्थित भारतीय कंपनी ‘प्राज’ जगात सर्वोच्च स्थानी
पुणे : जागतिक जैव अर्थव्यवस्थेत भारताचे वाढते वर्चस्व सिद्ध करताना, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत उपाययोजना प्रदान करणाऱ्या पुणे स्थित प्राज इंडस्ट्रीजची जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकाची हॉटेस्ट कंपनी म्हणून निवड केली गेली आहे. वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित जागतिक जैव अर्थव्यवस्थेतील प्रमुख उद्योग परिषद असलेल्या एबीएलसी (ABLC) मध्ये नुकतीच ही घोषणा करण्यात आली. अशा प्रकारे प्रगत जैव अर्थव्यवस्थेत सर्वोच्च स्थान मिळवणारी प्राज ही पहिलीच भारतीय आणि आशियाई कंपनी बनली.

अमेरिकेतील जैवतंत्रज्ञानविषयीचे सुप्रसिद्ध मासिक असलेले द डायजेस्ट हे जागतिक स्तरावर जैव अर्थव्यवस्थेमधील सर्वात स्पर्धात्मक कंपन्यांची वार्षिक क्रमवारी निवडत असते. ही क्रमवारी प्रख्यात ज्युरी सदस्य, आंतरराष्ट्रीय निवडकर्ते आणि त्यांच्या जगभरातील ६.१ दशलक्षपेक्षा जास्त सदस्यांच्या मतांवर आधारित असते. हॉटेस्ट कंपन्यांच्या यादीमध्ये अशा संस्थांचा समावेश आहे ज्यांनी पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव निर्माण करून जैव अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे.
६ खंडांमधील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक संदर्भ आणि प्रकल्प असलेली ऊर्जा संक्रमण आणि हवामानबदलांवर कमी-कार्बनयुक्त, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाययोजना शोधणारी कंपनी म्हणून, प्राज विश्वपातळीवर नावारूपाला आली आहे. प्राजचा जागतिक जैव अर्थव्यवस्थेतील महत्वाकांक्षी कंपनी ते जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याचा चार दशकांचा प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे.
या यशाबद्दल प्राजचे अभिनंदन करताना बायोफ्युएल्स डायजेस्टचे संपादक आणि प्रकाशक जिम लेन म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कामगिरी केल्यानंतर, प्राज इंडस्ट्रीजने जैव अर्थव्यवस्थेमधील हॉटेस्ट कंपन्यांमध्ये क्रमांक १ कंपनी म्हणून प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे यासाठी डायजेस्टच्या वाचकांनी आणि आंतरराष्ट्रीय निवडकर्त्यांनी मतदान केले आहे. या क्रमवारीतील प्रथम क्रमांकाने प्राजला ३,००० पेक्षा जास्त पात्र कंपन्यांच्या तुलनेत दृश्यमानता आणि विश्वासार्हतेच्या शिखरावर आणले आहे, यात काही आश्चर्य नाही. कारण ज्याप्रमाणे जगभरातील नेट झिरो वचनबद्धतेमुळे लोकांना जैव अर्थव्यवस्थेच्या संभाव्यतेबद्दल जागृत केले जात आहे आणि भारत जैव अर्थव्यवस्थेच्या विकास आणि उपयोजनाबाबत जागतिक स्तरावर अग्रगण्य कंपनी म्हणून आपला ठसा उमटवला आहे त्याचप्रमाणे प्राज प्रगती तंत्रज्ञानाचा एक विस्तृत पोर्टफोलिओ पुढे आणत आहे.”
या ऐतिहासिक कामगिरी बद्दल बोलताना प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले. ”जागतिक कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात एका भारतीय कंपनीने जागतिक जैव अर्थव्यवस्थेमध्ये सर्वोच्च सन्मान प्राप्त केले आहे, ही राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे. मला विश्वास आहे की या उच्च तंत्रज्ञान-केंद्रित क्षेत्रात नवीन विकसित भारताचे हे आणखी एक दमदार पाऊल आहे. ही ऐतिहासिक कामगिरी आमच्या भागधारकांच्या, म्हणजे ग्राहक, भागीदार आणि इतर गुंतवणूकदार समुदायाच्या निरंतर वचनबद्धतेमुळे शक्य झाली आहे. या सन्मानासोबतच येणाऱ्या मोठ्या अपेक्षांची व जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे आणि टीम प्राज त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी संरेखित स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रमाण म्हणून प्राजच्या यशाकडे पाहिले जाते.”
