Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

सुमधुर बासरीवादन, प्रभावी गायन अन्‌‍ बहारदार कथक नृत्याद्वारे सप्तरंगांची उधळण

पुणे : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या वृंदावन गुरुकुलातील गुणवंत कलाकारांचे सुमधुर बासरीवादन, रेनी चौरसिया यांचे प्रभावी शास्त्रीय गायन तर ऋजुता सोमण कल्चरल ॲकॅडमीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या बहारदार कथक नृत्याद्वारे सप्तरंगांची उधळण करित कृष्ण लिलांचेही अनोखे दर्शन घडले.
निमित्त होते ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे होळीनिमित्त आयोजित केलेल्या ‌‘होली के रंग स्वरों के संग’ या विशेष कार्यक्रमाचे. ज्येष्ठ गायिका, विदुषी अनुराधा चौरसिया, चित्रपट दिग्दर्शक राजीव चौरसिया यांची प्रमुख उपस्थिती होती. ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संस्थापक प्रविण कडले, चेतना कडले,  कथक नृत्यांगना ऋजुता सोमण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वृंदावन गुरुकुलातील गुणवंत बासरीवादक किरण बिश्त, वैष्णवी जोशी, रेणुका लिखिते, घन:श्याम चांद यांच्या वादनाने झाली. कलाकारांनी राग बिहागमधील आलाप, जोड आणि बंदिश सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर काफी रागातील सुप्रसिद्ध ‌‘रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे’ हे गीत बासरीवादनातून सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. सूर-लय-तालाचा अनोखा संगम साधत कवी नारायण त्रिपाठी लिखित आणि ज्येष्ठ गायिका, विदुषी अनुराधा चौरसिया व रेनी चौरसिया यांनी संगीतबद्ध केलेली ‌‘कृष्ण होली मे रंग जा’ ही रचना गायिका रेनी चौरसिया व गायक-संवादिनी वादक सुभ्रदीप साहू यांनी सादर केली. ‌‘रंगी सारी गुलाबी चुनरिया मोहे मारे नजरिया सावरिया’ ही रचना रसिकांना विशेषत्वाने भावली. या रचनांना बासरीवादकांनी समर्पक साथ केली. आशिष राघवानी यांची तबलासाथ होती. या गायन-वादन मैफलीने रसिकांनी होळीच्या उत्सवाचे रंग लुटले तसेच कृष्णाच्या खट्याळ लिलांचा आनंदही अनुभवला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ईशा छत्रे, फाल्गुनी कुलकर्णी, प्रज्ञा विजयन, ईश्वरी कापरे, नेहा दामले, शुभत्रयी सतवे, सानिका जोशी, सौम्या छाजेड, रेवती सोमण या कथक नृत्यांगनांनी राधा-कृष्णाच्या अनोख्या नात्याची ओळख करून देत वंदना सादर केली. त्यानंतर शिवशक्तीचा बंध दाखविणारे वैशिष्ट्य चौदा मात्रांच्या ताल धमार मधून दाखविताना परंपरा आणि नाविन्यता यांचा संगम साधला. बसंतबहार रागात नृत्त आणि अभिनयाचा मिलाफ साधत चतरंग सादर करून रंगांच्या सणाची सौंदर्यपूर्ण मांडणी केली. राधा-कृष्ण आणि गोपगोपिका यांनी खेळलेल्या होळीचे दर्शन घडविताना पंडित कुमार गंधर्व रचित व गुरू पंडिता रोहिणी भाटे यांची नृत्यसंरचना असलेली होरी सादर केली. कार्यक्रमाची सांगता कवी परमानंद दास यांनी श्रीकृष्णावर रचलेल्या ‌‘आज दधी मिठो मदन गोपाल’ या रचनेवर नृत्य सादर करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  रश्मी वाठारे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading