Sunday, October 4, 2026
Latest NewsPUNE

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आयोजित ‘२५ वा भारत रंग महोत्सव’ पुण्यात

 

पुणे : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तर्फे २५व्या भारत रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.हा महोत्सव १ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत होणार आहे. या नाट्य महोत्सवा दरम्यान, २१ दिवसांमध्ये देशातल्या १५ शहरांमध्ये १५० हून अधिक सादरीकरणे आणि असंख्य कार्यशाळा, चर्चा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणारे मास्टर क्लासेस आयोजित करण्यात आले आहेत. हा महोत्सव भारतीय आणि जागतिक नाट्य परंपरांचे समृद्ध विविध पैलू अधोरेखित करेल. याव्यतिरिक्त, हे वर्ष भारत रंग महोत्सवाच्या स्थापनेच्या २५ व्या वर्धापन दिनाचे वर्ष आहे.

पुण्यात, हा नाट्यमहोत्सव २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. या महोत्सवातील सर्व नाट्यप्रयोग नव्याने उद्घाटन झालेल्या डॉ. श्रीराम लागू रंगवकाश येथे सदर केले जाणार आहेत. दिनांक २ फेब्रुवारी रोजी इस्माइल चुनारा आणि साबीर इर्शाद उस्मानी यांनी अनुवादित केलेल्या आणि एन.एस.डी. रिपर्टरी कंपनीने सादर केलेल्या ‘लैला मजनू’ या नाटकाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. या महोत्सवात विविध भाषांमधील उत्तम नाटकांचा समावेश आहे. यामध्ये आदिती राव आणि नील चौधरी यांचे ‘द नाईट्स’ (हिंदी), चंदन सेन यांचे ‘अनिकेत संध्या’ (बांगला) आणि मृणालिनी वनारसे यांचे ‘डार्विन’ (मराठी) यांचा समावेश आहे. महोत्सवाचा समारोप ६ फेब्रुवारी रोजी के वाय नारायणस्वामी लिखित आणि बी जयश्री दिग्दर्शित ‘पारिजात’, या नाटकाने होणार आहे. यातील प्रत्येक नाटक आपल्याला आपल्या देशातील वैविध्यपूर्ण आणि अनोखी सांस्कृतिक ओळख उलगडून दाखवणार आहे. या महोत्सवात रंगमंचावरील भाषा आणि कथनशैली यांच्यातील परस्परसंवादाचा एक आनंददायी अनुभव पुणेकर रसिकांना मिळणार आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने मुंबईत, २५वा भारत रंग महोत्सव (बीआरएम २०२४) आयोजित केला आहे. १ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपी ) इथे, एका शानदार उद्घाटन समारंभात जगातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव असलेल्या या भारत रंग महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि एनएसडीचे अध्यक्ष परेश रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

एनसीपीए येथे आयोजित या उद्घाटन समारंभात आणि रेड-कार्पेट कार्यक्रमात एनएसडीचे अध्यक्ष पद्मश्री परेश रावल, आणि इतर प्रमुख नाट्य कलाकार आणि अभिनेते सहभागी होणार आहेत . प्रसिद्ध अभिनेते आणि एनएसडीचे माजी विद्यार्थी पंकज त्रिपाठी हे ‘यंदाच्या महोत्सवाचे सदिच्छादूत म्हणजे रंग दूत’ असतील. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार, गायक आणि एनएसडीचे माजी विद्यार्थी स्वानंद किरकिरे यांनी ‘रंग गान’ हे यंदाच्या महोत्सवासाठीचे विशेष गीत तयार केले आहे. यंदाचा महोत्सव ‘वसुधैव कुटुंबकम, वंदे भारंगम’: सामाजिक समरसतेसाठी काम करणाऱ्या जगभरातील कलाकार आणि नाट्यकर्मी यांच्या एकतेचा सोहळा आणि त्यांच्या कार्याला सलाम’, या संकल्पनेवर आधारित आहे. या महोत्सवा दरम्यान एनएसडीने ‘रंग हाट’ किंवा जागतिक नाट्य बाजाराचे देखील आयोजन केले आहे.

“आपण भारत रंग महोत्सवाच्या २५ व्या वर्षात पदार्पण करत असताना, हा महोत्सव विशेष महत्वाचा ठरतो. कलात्मक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक विविधता सादर करण्याची वचनबद्धता यातून दिसते”, असे एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या पाव शतकात, या महोत्सवाने जागतिक नाट्य परंपरांचे अनेक समृद्ध पैलू अधोरेखित करत, मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. हा महोत्सव नाट्यक्षेत्रातील केवळ विलक्षण सर्जनशीलताच दाखवत नाही तर सहकार्याच्या सौंदर्यावरही भर देतो, असे त्यांनी सांगितले. या वर्षीचा महोत्सव मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्रिपाठी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading