वाहन उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखून एआरएआयच्या वतीने भविष्यवेधी संकल्पना सादर
पुणे : ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या संस्थेतर्फे वाहन उद्योग क्षेत्रासाठी १८ व्या सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी अर्थात सिॲट २०२४ मध्ये काही भविष्यवेधी संकल्पना सादर करण्यात आल्या आहेत. ही द्विवार्षिक परिषद मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्सिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटर (पीआयईसीसी) येथे येत्या २५ जानेवारी पर्यंत संपन्न होत आहे. यामध्ये एआरएआय अकादमीच्या वतीने खास प्रशिक्षणासाठी निर्मित केली गेलेली बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, एआरएआयच्या इतर विभागांनी विकसित केलेली इलेक्ट्रिक ट्रक – बस यासारख्या मोठा वाहनांच्या चार्जिंग साठी सुयोग्य अशा ओव्हरहेड ऑटोमेटेड चार्जिंग डिव्हाईस (ओएचसीडी) प्रणाली, हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करून चालणारी वाहने इत्यादी प्रदर्शनास भेट देणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दुचाकी व चार चाकी इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित होत आहे. ही इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी १०० किलो व्हॅट क्षमतेचा चार्जर वापरल्या जातो. या क्षमतेने बॅटरी चार्ज होण्यासाठी तीन तासाचा वेळ लागतो. नजीकच्या भविष्यात बस, ट्रक अशा अवजड इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुयोग्य अशी चार्जिंग यंत्रणा विकासीत करण्यावर सध्या एआरएआय काम करत आहे. ओव्हरहेड ऑटोमेटेड चार्जिंग डिव्हाईस (ओएचसीडी) असे त्याचे नाव आहे. या चार्जरची क्षमता ६०० किलो व्हॅट इतकी असणार असून या चार्जरद्वारे ० ते ८०% बॅटरी चार्ज करण्यासाठी केवळ २५ मिनिटांचा अवधी लागेल. या चार्जरचा प्रोटोटाईप एआरएआयने तयार केला असून हे विकसित तंत्रज्ञान पुढील वर्षभरात बाजारपेठेमध्ये उपलब्ध असेल अशी माहिती एआरएआयचे उपसंचालक अभिजित मुळे यांनी दिली.
नजीकच्या भविष्यात हायड्रोजन हे वाहनांसाठीचे महत्त्वाचे इंधन म्हणून विकसित होण्याची शक्यता पाहता. या क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने सिॲट २०२४ मध्ये एका विशेष हायड्रोजन पॅव्हेलियनची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी हायड्रोजनवर चालणारी बस, ट्रक, हायड्रोजनवर चालणारे टाईप ४ सिलेंडर, हायड्रोजन फ्युएल किट आदी प्रदर्शित करण्यात आले आहे. कोणत्याही वाहन उत्पादकाने हायड्रोजनवर चालणारी वाहने विकसित करून बाजारात आणल्यास त्या वाहनाचे सुटे भाग आणि वाहनाची संपूर्ण चाचणी करण्यास आता एआरएआय सज्ज आहे. या सर्व चाचण्यांसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा आणि प्रक्रिया आता एआरएआयमध्ये उपलब्ध करण्यासाठी तयारी सुरु असल्याची माहिती यावेळी एआरएआय वरिष्ठ उपसंचालक सुकृत ठिपसे यांनी दिली. यासोबतच एआरएआयच्या वतीने हायड्रोजनवर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती हाती घेण्यात आली असून हे इंजिन भारत सरकारच्या बीएस ६ मानांकनांची पूर्तता करणारे असेल, असेही ठिपसे म्हणाले.
