युफोरिया बँडच्या सादरीकरणाने वसंतोत्सवच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप
पुणे : डॉ पलाश सेन यांनी सुरु केलेल्या युफोरीया बँडच्या सादरीकरणाने पुणेकरांनी एकाहून एक सरस हिंदी गीतांचा आस्वाद आज घेतला. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १७ व्या वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप आज युफोरिया बँडच्या सादरीकरणाने झाला.
कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्मस् या ठिकाणी महोत्सव सुरु असून पुनीत बालन समूह यांच्या विशेष सहकार्याने यावर्षीच्या १७ व्या वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, नेहा देशपांडे, दीप्ती माटे, पुनीत बालन समूहाचे पुनीत बालन, व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश असबे, पु ना गाडगीळ यांच्या अजित गाडगीळ, तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात सादर झालेल्या युफोरिया बँडच्या सादरीकरणाने पुणेकरांसमोर ९० च्या दशकातील हिंदी गीतांचा नजराणाच जणू सादर झाला. ‘वक्रतुंड महाकाय…’ या रचनेने त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘रोक सको तोह रोक लो…’, ‘धूम पिचक धूम…’, ‘तुही मेरी जिंदगी…’, कैसे भूलेगी मेरा नाम…’, ‘एक अजनबी हसीना से…’ ही गीते प्रस्तुत केली. यावेळी प्रियंका बर्वे यांनी धूम पिचक धूम… या गीताला गायनसाथ केली. यानंतर ‘जुगनी’ हे पंजाबी हिट गाणे देखील सादर झाले. बँडने सादर केलेल्या ‘माएरी…’, ‘कभी आना तू मेरी गली…’, ‘मच गया शोर…’, ढगाला लागली कळ…’ या गीतांना रसिकांनी दाद दिली. राहुल देशपांडे आणि पलाश सेन यांनी एकत्रित सादरीकरण करीत दुसऱ्या दिवसाचा समारोप केला.
पलाश सेन यांना यावेळी प्रशांत त्रिवेदी (तबला), राकेश भारद्वाज (पर्कशन्स), आदित्य बेनिया (गिटार), विशाल मेहता (ड्रम), आकाश शर्मा (बासरी), विशाल दीक्षित (की बोर्ड), जयश्री बसू, दीपश्री बसू व किशन सिंग (गायनसाथ), नितेश अहुजा, दीपक गौतम, अनिल बनकर आणि अलोक फरांदे यांनी साथसंगत केली. स्नेहल दामले आणि राजेश दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
