Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

पीयूष मिश्रा यांच्या सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध

पुणे  : सुप्रसिद्ध अभिनेते, गायक, गीतकार, नाटककार, संगीतकार आणि पटकथा लेखक पीयूष मिश्रा यांनी सादर केलेल्या ‘हुस्ना…’, ‘वो सुहाने दिन, आशिकाने दिन…’ , ‘एक बखत की बात बतायें, एक बखत की…’ , ‘थोडा नजारा… ‘, ‘ इक बगल मैं चांद होगा ..’ या आणि यांसारख्या अनेक रचनांवर पुणेकर रसिकांनी ठेका धरला… निमित्त होते वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १७ व्या वसंतोत्सवाचे.

कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्मस् या ठिकाणी आजपासून या महोत्सवाला सुरुवात झाली. पीयूष मिश्रा यांच्या बल्लीमारन गृपच्या सादरीकरणाने महोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला.

वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, नेहा देशपांडे दीप्ती माटे, व्यंकटेश बिल्डकॉनच्या पियुषा असबे, भारती विद्यापीठचे सहसचिव डॉ. महादेव सगरे, पु ना गाडगीळ यांच्या रेणू अजित गाडगीळ, सूर्यकांत काकडे आणि असोसिएटस् चे जय काकडे, मॅसकॉटचे भरत कुळहल्ली, तेजस उपाध्ये व राजस उपाध्ये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या आणि वाह वाह… असा पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पहायला मिळाला.
मिश्रा यांनी यावेळी आपल्या उमेदीच्या काळातील मुंबई मधील आठवणींना उजाळा दिला. दिग्दर्शकांनी त्यांची रिजेक्ट केलेली गाणी आपण कशी सोन्यासारखी जपून ठेवायचो याचे किस्से त्यांनी उपस्थितांना सांगितले.

‘डेन्मार्क के हालातो मैं…’, ‘ आदमी का क्या है…’, ‘ इस घडी ये दिल है आवारा…’, ‘ आये रे रुपयों की झंकार नवी चवन्नी…’ ही गीते त्यांनी यावेळी सादर केली.

त्यांनी सादर केलेल्या सुप्रसिद्ध ‘ मखमल की नाजूक दिवारें भी हाँगी…’ या त्यांच्या ‘घर’ रचनेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply