Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विद्यापीठांनी संस्था बांधणीशास्त्र, नेतृत्वशास्त्र आणि संघटनशास्त्र या ज्ञानशाखा निर्माण कराव्यात – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

पुणे : विद्यापीठांनी संस्था बांधणीशास्त्र, नेतृत्वशास्त्र आणि संघटनशास्त्र यांसारख्या उपायोजनक्षम ज्ञानशाखा निर्माण कराव्यात. जेणेकरून वैचारिक दांभिकतेचे आकर्षण मुळापासून नष्ट होण्यास मदत होईल, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी पद्रान समारंभात बोलत होते. विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ आज १७ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. राज्याचे मा. राज्यपाल तसेच विद्यापीठाचे कुलपती मा. श्री रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. यांच्यासह व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी उपस्थित होते. या समारंभात १ लाख ५ हजार ६५४ विद्यार्थींना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. विद्यापीठ यावर्षी आपले अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे यावर्षीचा पदवी प्रदान सोहळा खास ठरला.

सध्या विद्यापीठीय वातावरणात संस्था बांधणी या विषयाची होत असलेली उपेक्षा संपवून नव्या व काल सुसंगत विषयांवर काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यापीठाने संस्था बांधणी ही नवीन ज्ञान शाखा सुरू करावी. तसेच विद्यापीठ सारख्या संस्थांचे संस्था बांधणी किंवा लेखा परीक्षण घडवून आणले पहिजे असे मत डॉ. सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. तसेच आधुनिक प्रबंधन शास्त्राच्या चौकटीत नेतृत्व शास्त्र, संघटन शास्त्र आणि संस्था बांधणी शास्त्र असे तीन्ही ज्ञान प्रवाह विकसित व्हायला हवे असल्याचेही ते म्हणाले. तर समाजात वैचारिक दांभिकपणा, मध्यामांप्रती स्नेह वाढत चाललेला आहे. त्यामुळे हे सर्व टाळायचे असेल तर नव्या पिढीला समाज – संबंध शास्त्र अशा प्रकारच्या एक नव्या सर्वकष ज्ञान शाखेचे शिक्षण देण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल, असेही यावेळी डॉ. सहस्रबद्धे म्हणाले.

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादीत नसून एक जीवंत, समाज संलग्न, सहयोगी समुदाय आणि एक समृद्ध राष्ट्र निर्मितीची किल्ली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी यावेळी केले. ज्ञान केवळ माहितीचा संग्रह नसल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले, ज्ञानाच्या आधारे नवसंस्कृती उभी राहते, ज्ञानामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होतो. ज्ञान नाविन्य आणि परिवर्तनाचे उत्प्रेरक आहे. ज्ञान माणसाला योग्य निर्णय घेण्यास सक्षम आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यायोग्य बनविते. ते प्रश्न विचारणे, विश्लेषण करणे आणि मूल्यांकन करण्यासाठी माणसाला प्रोत्साहित करते. ज्ञान वर्तमान आणि भविष्याला जोडणारा सेतू असल्याने उच्च शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञाननिर्मिती करून विद्यार्थी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत योगदान देऊ शकतील, असा विश्वास श्री.बैस यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यापीठ देशपातळीवर आघाडीवर आहे. पायाभूत आणि ज्ञान शाखांचे सक्षमीकरण करणे, सर्वसमावेशक शिक्षणाची कास धरणे हे पुढील ५ वर्षाचे ध्येय असल्याचे कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी म्हणाले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ वार्ता’ या पदवीप्रदान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या १० विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यात नाशिकमधील अशोका सेंटर फॉर बिझनेस अॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज महाविद्यालयातील श्रीमती रिद्धी सुनिल कलंत्री या विद्यार्थीनीला ‘द प्रेसिडेंट ऑफ इंडिया शंकर दयाल शर्मा सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेंतर्गत सन २०२२-२०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्जतमधील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राजक्ता प्रमोद पठाडे या विद्यार्थीनीचा ‘श्रीमती निलिमाताई पवार सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला. यांच्यासह वनस्पती शास्त्र विषयातील उत्कृष्ट पीएचडी थिसीससाठी सतिशकुमार मौर्य, गणित विषयातील उत्कृष्ट पीएचडी थिसीससाठी अमोल सोनवणे, मराठी विषयातील उत्कृष्ट पीएचडी थिसीससाठी विजय कामडी, इतिहास विषयातील उत्कृष्ट पीएचडी थिसीससाठी राहुल मगर, विज्ञान शाखेत गुणवत्ता प्राप्त गंगाधर किटाळे, संजू पांडे, एमबीए ट्राय सेमिस्टरमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी विग्यान पटिएल यांचा सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आले.

विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात ८५ हजार ४४० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, १९ हजार ७६८ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, २२६ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, १८७ विद्यार्थ्यांना पीएच.डी., ३४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर ४ विद्यार्थ्यांना एम.फिलचे प्रमाणपत्र अशा एकूण १ लाख ५ हजार ६५४ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले. या कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्माचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सहा सुवर्णपदक
नाशिकमधील अशोका सेंटर फॉर बिझनेस अॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज महाविद्यालयाच्या मुजेन कोकणी या विद्यार्थीनीने एमबीए परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविल्यामुळे सर्वाधिक सहा सुवर्णपदक मिळवले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading