Sunday, October 4, 2026
Latest NewsPUNE

साधू वासवानी यांच्या ५८ व्या पुण्यतिथीची सुरुवात प्रभातफेरीने


पुणे : साधू वासवानी यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त दि. १६ आणि १७ जानेवारी २०२४ दरम्यान साधू वासवानी मिशन, पुणे येथे दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानिमित्त या महान संतास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दूरवरून भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे मिरवणुकीने (प्रभात फेरी) कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने दि. १६ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता पहाटे मिरवणुकीला सुरुवात झाली. भक्तांनी प्रथम साधू वासवानी आणि दादा जे. पी. वासवानी यांच्या पवित्र समाधींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी मिशनच्या कार्यकारी प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांनी शोभायात्रेचे नेतृत्व केले. भजन आणि कीर्तन करत ही मिरवणूक पुणे कॅम्प परिसरासह हौसिंग सोसायट्यांमधून फिरली.

या मिरवणुकीत सेंट मीरा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. सोसायट्यांनी साधू वासवानी आणि दादा जे. पी. वासवानी यांच्या पादुकांची स्थापना केली होती. प्रत्येक ठिकाणी दीदी कृष्णाकुमारी यांनी दीप प्रज्वलित केले. यात्रेत सहभागी भाविक यानंतर पवित्र समाधस्थळी परतले. यावेळी त्यांनी गुरूंचा गौरव आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भावपूर्ण भजन आणि कीर्तन गायन केले.

त्यानंतर पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त इंद्रायणी करचे आणि मनपा अधिकाऱ्यांनी साधू वासवानी चौकातील साधू वासवानी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी प्रभातफेरी दरम्यान जाणवलेल्या भावना व्यक्त करताना भाविक रेणू वाधवा म्हणाल्या, “त्या विशिष्ट तेजपूंज प्रकाश क्षेत्रातून एका अनोख्या उर्जेची अनुभूती आपल्याला प्राप्त होते”. तर यात्रेत सहभागी दुसरे एक भक्त म्हणाले, “या प्रभातफेरीच्या माध्यमातून आपण आशीर्वाद अनुभवू शकता, जो आपणा सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे”.

या कार्यक्रमांनिमध्ये प्रामुख्याने प्रार्थना सत्र, सत्संग, साधू वासवानी, दादा जे. पी. वासवानी यांचे ध्वनिचित्रमुद्रित मार्गदर्शन आणि दीदी कृष्णाकुमारी यांचे लाइव्ह भाषण यावेळी प्रसारित करण्यात आले.

तर, दि. १७ जानेवारी रोजी दीपक यात्रा आणि साधू वासवानी यांच्या जीवन आणि शिकवणीवर आधारित एक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.  कार्यक्रमांचा एक भाग म्हणून महाप्रसाद, व्यापक सेवादेखील आयोजित करण्यात आली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading