डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोरील तो खांब अखेर हटवला
छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट, नामांतर शहीद स्तंभ व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या एकत्रित छायाचित्रात अडथळा निर्माण करणारा पथदिव्याचा खांब काल रात्री 12 वाजेच्या सुमारास महानगरपालिकेच्या वतीने हटविण्यात आला आहे.
रिपब्लिकन सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांनी या बाबत फोन वरून मनपा प्रशासक जी श्रीकांत यांना तात्काळ खांब हटविण्याची सूचना केली होती.
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने सचिन निकम, अतुल कांबळे, पँथर्स रिपब्लिकन चे विद्यार्थी नेते गुणरत्न सोनवणे, कुणाल भालेराव या साठी सतत पाठपुरावा करत होते.
यावेळी नामविस्तार दिनानिमित्त दि.12 जानेवारी पासूनच नागरिकांची गर्दी असल्याने खांब हटविण्यास विलंब झाला त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत सोहळा संपन्न होताच खांब हटविला आहे.
लवकरच या ठिकाणी भिंती लगत दोन्ही बाजूनी ‘2 सेट’ पथदिवे बसविण्यात येणार आहेत असेही मनपा प्रशासनाने सांगितले आहे.
