सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सौर उर्जेवरील कार्यशाळा संपन्न
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राद्वारे ‘सौर उर्जा’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते सौर उर्जा क्षेत्रातील तज्ञ अजित बहादूर, कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. आर. एस. पंडित उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित बहादूर यांनी सौर ऊर्जेच्या परिवर्तनीय संभाव्यतेबद्दल आणि शाश्वत भविष्याला आकार देण्यासाठी तिची भूमिका याविषयी माहिती दिली. तसेच सौर तंत्रज्ञानातील नवीनतम प्रगती आणि पर्यावरणीय आव्हाने कमी करण्यात महत्त्वाची भूमिका याविषयी उपस्थितांचे प्रबोधन केले. तर डॉ.विजय खरे यांनी आपल्या भाषणात नवीन आणि पर्यावरणपूरक ऊर्जा संसाधनांचा अवलंब करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच पारंपारिक ज्ञान प्रणाली जतन करणे, शाश्वत विकासासाठी सर्वांगीण दृष्टीकोन वाढवणे याच्या महत्त्वावरही भाष्य केले. यावेळी बोलताना डॉ. पंडित यांनी गतिमान आणि शाश्वत भविष्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी व्यक्तींना सुसज्ज करण्यासाठी सतत शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
