परंपरेतील तत्व मुरवून नवतेच्या मार्गाने स्मिताची आश्वासक वाटचाल – डॉ. सुचेता चापेकर
पुणे : ‘गुरुलाही नेहमी उत्तम शिष्याची ओढ असते. नव्हे, उत्तम शिष्य मिळण्याचे भाग्य लागते. मी भाग्यवान आहे कारण मला स्मिता महाजन शिष्य म्हणून लाभली. तिची नृत्यसाधना परंपरेचे तत्व मुरवून घेत नवतेच्या मार्गाने आश्वसक वाटचाल करते आहे, याचा मला आनंद आहे, असे उद्गार ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू विदुषी डॉ. सुचेता चापेकर यांनी काढले.
‘आर्टिट्यूड’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘पॅनोरमा नृत्य महोत्सवात’ त्या बोलत होत्या. भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यसंरचनाकार, कवयित्री, गायिका, संगीतकार, संशोधक आणि नृत्यगुरू अशा अनेक भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या स्मिता महाजन यांच्या षष्टयब्दीपूर्तीचे औचित्य साधून, त्यांच्या नृत्यसंरचनांना सामावून घेणाऱ्या ‘पॅनोरमा’ या दोन दिवसीय नृत्यमहोत्सवामध्ये सुचेता चापेकर मार्गदर्शन करत होत्या. घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे हा समारंभ संपन्न झाला.
यावेळी स्मिता महाजन लिखित ‘मार्गम् उन्मेष’ – भाग ३ या पुस्तकाचे प्रकाशनही डॉ सुचेता चापेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आर्टीट्यूड संस्थेच्या वतीने स्मिता महाजन यांच्या नृत्यविषयक व्हिडिओजचा समावेश असलेल्या विशेष पोर्टलचे अनावरणही झाले. नाट्यशास्त्र, संगीतरत्नाकर आणि अभिनवदर्पण या तीन महत्त्वाच्या ग्रंथांतील ‘असंयुक्त हस्तमुद्रां’ विषयीचे विवेचन, असणाऱ्या विशेष भागाचे लोकार्पणही करण्यात आले.
डॉ. सुचेता चापेकर पुढे म्हणाल्या, ‘आपल्याकडे वाग्येयकारांची मोठी परंपरा दिसते, पण ते स्वतः नृत्य करत नसत. स्मिताने तेही आत्मसात केले आहे. एक सर्वांगीण कलावती म्हणून ती फक्त नृत्यविचारच नव्हे तर संपूर्ण कलाविचार पुढे नेत आहे, हे महत्त्वाचे आहे. तिचा हा प्रवास मी सुरवातीपासून अनुभवत आहे. परंपरेतील तत्व तिने जाणले आहे आणि काळानुरूप नवतेचा तिचा ध्यासही मी समजून घेत आहे. तिच्या काही रचनांवर मी स्वतः नृत्य करते, तेव्हा मला अतिशय समाधान वाटते. तरीही सर्व कलासाधकांनी पारंपरिक रचनांचा अधिकाधिक शोध घेत, त्यातील अभिव्यक्तीच्या क्षमता पडताळून पाहिल्या पाहिजेत, असे मला वाटते. आपल्या शिष्यांच्या शिष्या नृत्य करताना पाहते, तेव्हा एक व्यापक असे नृत्यकुटुंब निर्माण झाल्याचा आनंद होतो,’ अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.
तांत्रिक बाबींची माहिती समीर साठे आणि संजीवनी साठे यांनी उपस्थितांना दिली. पल्लवी नाईक, ऋचिता राणे यांनी मनोगत मांडले. अनुष्का महाजन यांच्या पुढाकाराने स्मिता महाजन यांचा जीवनप्रवास मांडणारा विशेष दृकश्राव्य अनुभवही रसिकांनी घेतला.
फोटो ओळ – स्मिता महाजन यांच्या षष्टयब्दीपूर्तीचे औचित्य साधून त्यांच्या नृत्यसंरचनांना सामावून घेणाऱ्या ‘पॅनोरमा’ या दोन दिवसीय नृत्यमहोत्सवामध्ये विदुषी डॉ सुचेता चापेकर यांच्या हस्ते महाजन लिखित ‘मार्गम् उन्मेष’ – भाग ३ या पुस्तकाचे प्रकाशन घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाले. यावेळी फोटोत डॉ सुचेtता चापेकर आणि स्मिता महाजन आदी.
