पैसे देऊन महाराष्ट्रावर बलात्कार होतोय – राज ठाकरे
अलिबाग : . महाराष्ट्रामध्ये जे-जे उत्तम आहे ते-ते हिसकावण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. हा प्रयत्न सर्व बाजूंनी होतो आहे. थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याचे गांभीर्य स्थानिक लोकांना असले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. आपण किती भोळसट आहोत त्याचा नमुना आज या शिबिरात दिसून येत आहे. मला पत्रकारांशी संवाद साधायचा होता. पण तुम्ही याला परिषद म्हणून नाव दिले, असे म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.
बाकी राज्यात त्यांचे नेते त्यांच्या माणसाचा विचार करत असतात. पण आपल्या इथे असे नाही. मला कळले की इथे काही गावे आहेत ती संपली. मला कल्पना आहे या गोष्टीची की सर्वांना पैशांची गरज आहे. तुमची जमीन आहे ती तुम्हाला विकायची, नाही विकायचं तुमचा प्रश्न आहे. पण त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळतो का?, असे राज ठाकरे म्हणाले.
जमीन विकताना मधला दलाल मराठी आहे, असे समजून आपण जमीन विकतो. जगाचा कोणताही इतिहास पहिला तर भूगोलावरच आहे. आज नाव्हा शेवा झाला. तेव्हा जमीन गेली. आज जर बाहेर कोणता व्यवसाय करायचा असला तर तुम्हाला तेथील लोकांना पार्टनर घ्यावे लागते. मग इथे का नाही?, असेही राज ठाकरे म्हणाले.
सहज तुम्ही जाऊन बघा की जमिनीचे रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर होत आहे. माथेरान, कर्जत आणि नेरळमधील जमिनी कोण घेत आहेत. या राज्यात फक्त मराठा लोकांनी राज्य केले आणि आता तुमचीच जमीन दुसरे येऊन घेत आहेत. हे काय फक्त रायगडमध्ये होत नाही तर ठाणे आणि इतर जिल्ह्यांतसुद्धा होत आहे. स्थानिक माणूस उद्ध्वस्त होत आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.
