Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

सुरेश वाडकर यांनी रंगवली ‌‘भावस्वरां’ची मैफल

पुणे : सुविख्यात पार्श्वगायक पद्मश्री पंडित सुरेश वाडकर यांच्या भावपूर्ण आणि नजाकतदार स्वरांनी स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरेल सांगता झाली. हिंदी चित्रपटगीते आणि मराठी भावगीते यांची बरसात यानिमित्ताने रसिकानी अनुभवली.

पंडित सुरेश वाडकर यांनी मैफलीची सुरवात ‌‘सांज ढले, गगनतले’ या गाजलेल्या चित्रपटगीताने केली. त्यानंतर ‌‘सीनेमे जलन आँखो में तूफान सा क्यू है’ ही गजल सादर केली. या रचनेतील ‌‘क्या कोयी नयी बात नजर आती है हममे, आईना हमे देखके हैरान सा क्यू है’ या ओळी सध्या मी स्वतःकडे पाहून म्हणतो, असे वाडकर यांनी म्हणताच स्वरमंडपात हशा उसळला. ‌‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ या गीताला रसिकांनी जोरदार दाद दिली. ‌‘ऐ जिंदगी गले लगाले’ हे सदमा चित्रपटातील गीत विशेष रंगले. ‌‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील ‌‘हुस्न बहारो का’ या गीताची झलक त्यांनी ऐकवली. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे यांचे ‌‘जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा’ हे गीत, ‌‘दयाघना’ (पं. हृदयनाथ मंगेशकर यांची संगीतरचना), ‌‘लगी आज सावन की फिर वो झडी है’, ‌‘पाहिले न मी तुला’, ‌‘तू मला न पाहिले’, ‌‘तुमसे मिलके ऐसा लगा’.. अशी लोकप्रिय गीताची मालिकाच वाडकर यांनी सादर केली.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली म्हणून वाडकर यांनी ‌‘होती है क्या गम की शाम’ ही रचना गायिली. ‌‘गंध फुलांचा गेला सांगून’ या गीताची झलक त्यांनी ऐकवली. रसिकांच्या मागणीला मान देत ‌‘ओ कुडी मेरे सपनोमे मिलती है’ हे ढंगदार गीत सादर केले आणि ‌‘चप्पा चप्पा चरखा चले’ या गीताने त्यांनी सांगता केली.
त्यांना ओजस अढिया (तबला), गौरव वासवानी (पियानो), मानसकुमार (व्हायोलिन), निनाद मुळावकर (बासरी), राजू कुलकर्णी (ऑक्टोपॅड, पर्कशन) आणि विशाल धुमाळ (की बोर्ड) यांनी साथसंगत केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading