Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

किर्तन महोत्सवात रंगला कीर्तन संवाद!

 

पुणे: भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित ‘कथा कीर्तन महोत्सव’ मध्ये तिसऱ्या दिवशी दि. २९ नोव्हेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता अंजली कऱ्हाडकर, शिवानी कऱ्हाडकर या मायलेकिंचा पारंपरिक कीर्तन संवाद रंगला! पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला .

महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सवात हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आरती सचदेव, रत्ना शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी सूत्रसंचालन केले, स्वागत केले.

उल्हास पवार उद्घाटन प्रसंगी म्हणाले “आज कऱ्हाडकर माय लेकी कीर्तन संवाद सादर करणार आहे, ही एक प्रकारची कीर्तन जुगलबंदीच उपस्थितांना अनुभवायला मिळणार आहे! लय, विनय आणि अभिनय यांचा उत्तम संगम म्हणजे कीर्तन होय! जो अध्यात नाही आणि मध्यात नाही तो अध्यात्मिक म्हणावा!”

लक्ष्मीचे भक्त उपासक आणि सरस्वतीचे भक्त उपासक यांच्यातील लक्ष्मी आणि सरस्वती यात श्रेष्ठ कोण या विषयावरील भक्त संवाद हा आजच्या कीर्तनाचा विषय होता.प्रथम कीर्तनकार अंजली कऱ्हाडकर आणि कन्या शिवानी कऱ्हाडकर यांनी रामकृष्ण हरी राजाराम, रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम, तसेच जय शारदे वागेश्वरी ही पदे सादर केली.या नंतर पुरंदरदास कथा सादर करण्यात आली, पुरंदरदास हे प्रथम लक्ष्मी मातेचे उपासक होते, नंतर ते सरस्वती देवीचे उपासक झाले, यावरील कथा उभय कीर्तनकार कऱ्हाडकर यांनी सादर केली.कीर्तनकार कऱ्हाडकर यांना प्रिया केळकर गांगुली यांनी संवादिनीवर तर केदार तळणीकर यांनी तबल्यावर साथ दिली.

सप्ताह भर कथा कीर्तन

गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तन विशारद श्रेयस संजय कुलकर्णी यांच्या नारदीय कीर्तनाने सप्ताहातील चवथे पुष्प गुंफले जाणार आहे. सप्ताहातील पाचवे पुष्प शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तनचंद्र श्रेयस बडवे व किर्तन चंद्रिका सौ मानसी बडवे पती-पत्नीच्या ” कीर्तन जुगलबंदीने” गुंफले जाणार आहे. या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार ,दिनांक २ डिसेंबर रोजीसायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.

महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान ” कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या” या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यमतज्ञ प्रा.डॉ. विश्राम ढोले, तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

याच दिवशी सायंकाळी सहा वाजता कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे “महाभारतातील किर्तन परंपरा” यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे.

भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश मोफत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading