Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

सीमाने नकारात्मक भूमिकाही समर्थपणे साकारल्या : राजदत्त

पुणे : सीमाला प्रसिद्धीची हौस नव्हती. परंतु ती कलावंत म्हणून खूप मोठी होती. ती स्वत:च्या कामाबद्दल कधीही बोलायची नाही. ‌‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान तिचे व माझे स्नेहबंध जुळले त्यातूनच तिने मला भाऊ मानले, अशी आठवण सांगितली ती ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी.

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे प्रसिद्ध अभिनेते दिवंगत रमेश व सीमा देव यांच्यावर ‌‘सूर तेच छेडीता’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आज (दि. 27) पूना गेस्ट हाऊस येथे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी देव दाम्पत्याच्या चित्रपट कारकिर्दीला तसेच वैयक्तिक स्नेहबंधाला उजाळा देताना राजदत्त बोलत होते. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, भारतातील अग्रगण्य जाहिरात एजन्सीचे संचालक आणि रमेश व सीमा देव यांचे कनिष्ठ पुत्र अभिनय देव, राजदत्त यांची कन्या भक्ती राजदत्त यांची उपस्थिती होती.

रमेश व सीमा देव यांच्यावर चित्रित झालेली अजरामर लोकप्रिय गीते दृकश्राव्य माध्यमातून दाखविण्यात आली. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती किशोर सरपोतदार यांची होती तर निर्मिती सहाय्य ‌‘महक’च्या मनिषा निश्चल यांचे होते. दृकश्राव्य स्वरूपातील सादरीकरण शरद आढाव यांनी केले तर राजदत्त यांच्याशी शिरीष कुलकर्णी यांनी संवाद साधला. अजित कुमठेकर हे कार्यक्रमाचे समन्वयक होते.

अपराध चित्रपटाच्या दरम्यान एका वेगळ्या दृष्टीकोनातून रमेश व सीमा यांना भूमिका दिल्या. त्यावेळी माझ्या डोक्यात एक वेगळा प्रयोग करावा, कथेला एक वेगळा आयाम द्यावा या विचाराने त्यांना नकारात्मक भूमिका दिली आणि ती त्यांनी सार्थ ठरविली, असे एका प्रश्नाच्या उत्तरात राजदत्त यांनी सांगितले. सीमा आणि रमेश देव यांच्या लग्नाचा निश्चय झाला होता, पण सीमा हिची थोरली बहिण अविवाहित होती. थोरल्या बहिणीच्या लग्नाआधी आपण लग्न कसे करायचे असा प्रश्न सीमा हिच्यासमोर होता. त्या वेळी तिने माझ्या थोरल्या बहिणीशी लग्न करणार का असा प्रश्न मला विचारला. मीही त्यास होकार दिला आणि आमचे नाते अधिकच दृढ झाले.

रमेश व सीमा देव यांचा साखरपुडा चारुकाका सरपोतदार यांनी पूना गेस्ट हाऊसच्याच वास्तूत साजरा केला अशी आठवण याप्रसंगी सांगण्यात आली.

आई-वडिलांविषयीचे किस्से सांगताना अभिनय देव म्हणाले, आई-वडिलांचे स्वभाव पूर्णपणे भिन्न होते. आई मितभाषी होती तर बाबा बोलके होते. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्यांनी आम्हाला सर्वसामान्य आई-वडिलांप्रमाणेच वागविले. आई-वडिलांनी गाजविलेल्या चित्रपटांची वेगळ्या पद्धतीने मांडणी करावीशी वाटेल का? या प्रश्नाला उत्तर देताना अभिनय म्हणाले, त्या काळातील चित्रपट वेगळ्या पद्धतीने करावे असे मला स्वप्नातही वाटणार नाही. कारण त्या चित्रपटांच्या गुणवत्तेच्या समिपही जाऊ शकणार नाही. त्या काळात क्लोज कॅमेराला सामोरे जाणे ही कलाकाराची मोठी कसोटी असे. आमच्या कळत्या वयात आई-बाबा आमच्या बरोबर त्यांच्या जुन्या चित्रपटांविषयी खूप सविस्तर चर्चा करत असत. अपराध हा चित्रपट त्या काळात अतिशय पुढारलेल्या विचारांचा समजला जात असे. प्रेक्षकांना विचार करायला लावणारा हा चित्रपट होता.

भक्ती राजदत्त म्हणाल्या, सीमा मावशी व रमेश काकांनी आमचे आजोळ सांभाळले. सीमा मावशी अत्यंत साधी आणि प्रमेळ होती. तर रमेश काकांना उत्तम राहणीमान आणि मनमुराद जगण्याची आवड होती. त्या दोघांनीही आम्हा सर्व भावंडांना शेवटपर्यंत प्रेम दिले.

‌‘येणार नाथ आता’, ‌‘हृदयी प्रित जागते’, ‌‘जिवलगा कधी रे येशील तू’, ‌‘काल मी रघुनंदन पाहिले’, ‌‘सूर तेच छेडीता’, ‌‘सांग कधी कळणार तुला’, ‌‘गाडीवाद दादा’, ‌‘आला वसंत देही’, ‌‘शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात’ यासह रमेश व सीमा देव यांच्यावर चित्रित हिंदी व मराठी गीते दृकश्राव्य माध्यमातून रसिकांना ऐकायला मिळाली.

उमेश पेडगांवकर यांनी ‌‘सूर तेच छेडिता’ हे गीत सादर केले. किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविकात देव कुटुंबियांसमवेतचे स्नेहबंध उलगडले. अपराध चित्रपटाच्या प्रिमिअर प्रसंगी उपस्थित असताना प्रेक्षकांनी रमेश व सीमा देव यांच्यावर केलेल्या पुष्पवृष्टीचा मलाही लाभ झाला, असे त्यांनी आवर्जून सांगितले. सुरुवातीस राजदत्त व अभिनय देव यांचे मनिषा निश्चल आणि साधना व शर्मिला सरपोतदार यांनी औक्षण करून स्वागत केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading