Tuesday, July 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘सेल्फि विथ मेरी माटी’ विश्वविक्रम शहीदांना समर्पित – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : सेल्फि विथ मेरी माटी हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा गिनिस वर्ल्ड बूकमध्ये नोंदविला गेलेला विश्वविक्रम राज्यासाठी आणि देशासाठी मोठा असून, तो शहीदांना समर्पित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेशी जोडणारा असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्तिंचा सन्मान करताना बावनकुळे बोलत होते. राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील, संयोजक राजेश पांडे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, प्रदेश भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे व्यासपीठावर उपस्थित होते.

बावनकुळे पुढे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण केलेला विश्वविक्रम पुढील पंचवीस वर्षांत अन्य कुठलाही देश तोडू शकणार नाही. हा एकविसाव्या शतकातील मोदींनी निर्माण केलेला आत्मनिर्भर भारताचा आत्मिक, भावनात्मक विश्वविक्रम आहे. या विक्रमाची कल्पना, नियोजन, अंमलबजावणी, तंत्रज्ञानाचा वापर, मोठा लोकसहभाग याची केंद्राने नोंद घेत कौतुक केले आहे, ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

पाटील म्हणाले, या विक्रमासाठी 25 लाखांहून अधिक छायाचित्रे अपलोड करण्यात आली. देशभक्तीने वेडे झालेले तरूण ज्या देशात असतील, त्या देशाचा पराभव करणे कोणालाही शक्य होणार नाही. या उपक्रमातून मोठी उर्जा निर्माण झाली आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना नवीन कामाची प्रेरणा मिळते.

पांडे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमासाठी 75 दिवस चोवीस तास अथकपणे परिश्रम घेतले. नेतृत्वाचा विश्वास आणि सामुहिक प्रयत्नांचा आविष्कार यांच्या जोरावर तिसरा विश्वविक्रम करता आला. असे यश मिळविणारे पुणे विद्यापीठ पहिलेच आहे. डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन आणि पुनीत जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

 

अयोध्येला राज्यातून जाणार 15 लाख नागरिक
या वर्षी 22 जानेवारी रोजी देशातील सर्वात मोठी दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर आठ महिन्यात राज्यातून 15 लाख नागरिकांना अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी नेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी राजेश पांडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading