Tuesday, July 7, 2026
Latest NewsPUNE

बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे डॉ. भालचंद्र भागवत यांना आयुर्वेदभूषण पुरस्कार

पिंपरी : सत्याची पूजा, सेवेचा धर्म आणि ज्ञानाची लालसा ही त्रिसूत्री डॉ. भालचंद्र भागवत यांनी अंगिकारलेली आहे. पुण्याईच्या भूमिकेचे त्यांना फळ मिळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी जी पावले उचलली, त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.

बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ, माजी प्राचार्य डॉ. भालचंद्र भागवत यांना आयुर्वेदभूषण पुरस्कार देऊन डॉ. सबनीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. टिळक आयुर्वेद महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पुराणिक होते. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सरोज पाटील, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भीम गायकवाड, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, कवी उद्धव कानडे आदी उपस्थित होते.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले, आपला देश आयुर्वेदाची जन्मभूमी आहे. आयुर्वेद शास्त्राचे जे ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे. ते टिकविण्याचे तसेच पुढील पिढीला देण्याचे मोठे कार्यही डॉ. भागवत आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या माध्यमातून घडत आहे, ही चांगली गोष्ट आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. भालचंद्र भागवत म्हणाले, की सेवा हाच धर्म या भावनेतून आजपर्यंत कार्य करीत आलो आहे. सामाजिक भावनेतून कार्य करीत असताना त्यातून किती पैसा मिळेल, याचा कधीही विचार केला नाही. हा माझ्या कार्याचा गौरव आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. दिलीप पुरणिक यांनी डॉ. भागवत यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. भीम गायकवाड, डॉ. संभाजी मलघे, डॉ. सरोज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
 प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकात विशद केली. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

दरवर्षी दिला जाणार पुरस्कार : 
बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे दिल्या गेलेल्या आयुर्वेदभूषण पुरस्काराचे यंदाचे पहिले वर्ष असून, शिक्षण, वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीस प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मानाचा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे, असे बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकात सांगितले.

पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार : 
बाबा भारती यांचे विचार पुरोगामी महाराष्ट्राचा जिवंत वसा आणि वारसा आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निकट सहकारी म्हणून बाबा भारती यांचे  योगदान महाराष्ट्राला परिचित आहे. पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार म्हणून बाबा भारती याचे यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे पुत्र महेंद्र भारती ही चळवळ चालवत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading