देशाच्या विश्वगुरुत्वाच्या स्वप्नाची वीट चोखामेळा साहित्य संमेलनाने रचली : बाळासाहेब चौधरी
आळंदी : संतांचे विचार समाजव्यवस्थेला पूरक आहेत. समाजव्यवस्थेचा पाया मजबूत झाला तर देश प्रगती करेल, राष्ट्र एक होईल. देशात आज स्वातंत्र्य आहे पण संवाद नाही. कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे, असे झाल्यास देश उद्ध्वस्त होईल. अशा काळात संत साहित्याचे महात्म्य समाजाला पटवून द्यावे लागेल. देश विश्वगुरू पदाचे स्वप्न पाहत आहे. याची वीट पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रचली गेली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी केले. विश्वगुरुत्व हे कुणावर आक्रमण करून नव्हे तर संत साहित्याच्या मूल्य-तत्त्वज्ञानाचा अंगिकार केल्याने प्राप्त होणार असेही त्यांनी नमूद केले.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृदांवन फाऊंडेशनतर्फे आळंदी (पुणे) येथील एम. आय. टी. महविद्यालयात दोन दिवसीय पहिल्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संतांचे विचार, शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या ह. भ. प. बाबुराव वारे, दत्तात्रय शिंदे, प्रभाकर महाराज चाबुकस्वार, डॉ. ओम श्रीश दत्तोपासक, ह. भ. प. सुचेता गटणे, जानकी माने यांचा विशेष सन्मान ‘गजर भक्तीचा-सन्मान श्रद्धेचा’ या उपक्रमाअंतर्गत संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 19) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी चौधरी बोलत होते.
ह. भ. प. प्रभाकर महाराज चाबुकस्वार (पैठण), विद्याभारतीचे क्षेत्र मंत्री शेषाद्रीअण्णा डांगे, ह. भ. प. बाबुराव वारे, ह. भ. प. प्रा. पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर, ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज देहूकर, डॉ. ओम श्रीश दत्तोपासक, संमेलनाचे निमंत्रक सचिन पाटील व्यासपीठावर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा प्राचार्य उल्का चंदनशिवे होत्या.
चौधरी पुढे म्हणाले, समाजात वेळोवेळी निर्माण झालेली दुही संत विचारांनी कमी झाली; परंतु आज संतांचेच जाती-जातीत विभाजन झाले आहे. जातीवाद विसरून समाजातील प्रत्येक घटकाला सुखशांती प्राप्त व्हावी या करिता संतांचे कार्य, तत्त्वज्ञान, विचार अंगिकारण्याची गरज आहे.
शेषाद्रीअण्णा डांगे म्हणाले, समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित वर्गापर्यंत संतांचे विचार संत चोखामेळा यांनी पोहोचविले. संतांचा वैश्विक विचार हा देशाला उन्नत करणारा आहे.
सत्करार्थींच्या वतीने डॉ. ओम श्रीश दत्तोपासक, ह. भ. प. बाबुराव वारे यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचा सत्कार संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी, उल्का चंदनशिवे यांनी केला. प्रास्ताविक ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज देहूकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ लांडगे यांनी तर आभार सचिन पाटील यांनी मानले.