fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सर्वांच्या विचार आणि स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नंदुरबार : आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सर्व जाती-जमातींच्या विचारांचा आणि स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. आदिवासी बांधवांचा गौरव वाढवतानाच त्यांच्या विकासासाठी जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवसारख्या अभियानाच्या रुपाने आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे. त्यासाठी  सर्वांचा विकास हे उद्दीष्ट ठेऊन सुरु असलेले केंद्र सरकारचे काम आम्हाला निरंतर प्रेरणा देत आहे. राज्य शासनसुद्धा याच भूमिकेतून आदिवासी, शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य यासोबतच आदिवासी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करीत आहे. आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची वाट दाखवणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांच्या नावे राज्यातील आदिवासी बहुल 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ राबवित आहोत. एकूण 5 हजार कोटी रुपयांची ही योजना असून 6 हजार 838 किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेतून बांधले जाणार आहेत. आदिवासी आश्रमशाळांचे बळकटीकरण करून त्यातील 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांच्या संस्कृतीत आपल्या मातीचा गंध आहे. आजच्या हवामान बदलाच्या काळात प्रत्येकाने आदिवासी समाजाची जीवनशैली आणि वनसंवर्धनाबाबतची त्यांची जिद्द यापासून धडा घेण्याची गरज आहे. आपली माती, जंगल, संस्कृती राखण्याचे काम आदिवासी बांधव शेकडो वर्षांपासून करत आहेत. त्यांनी संस्कृती बरोबरच जंगलातील निसर्गसंपदाही जतन केली आहे, तिचे संवर्धन केले आहे. त्यांच्या योगदानामुळेच आज आम्ही समृद्ध वनसंपदा पाहू आणि अनुभवू शकतो, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

नंदुरबार जिल्हा आपल्या स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा करत असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच येथील घरकुल व स्मशानभूमींना जागा देण्यासाठी येणाऱ्या काळात नियोजन केले जाईल. तापी नदीवरून पाणीपुरवठा योजनेसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासोबतच दुष्काळाच्या परिस्थितीत शासन जिल्हावासीयांच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

देशात वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात राज्य अग्रेसर – डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, देशात वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात आपले राज्य अग्रस्थानी आहे. आजतागायत मान्य करण्यात आलेल्या वैयक्तिक वन हक्क दाव्यांची संख्या १ लाख ९८ हजार ९९१ असून, १ लाख ९८ हजार २३२ मान्य दावेधारकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी १ लाख ६७ हजार ३०१ दावेधारकांना सातबाराचे वाटप करण्यात आले आहे. सामूहिक वनहक्क मान्य दाव्यांची संख्या ८ हजार ६२४ आणि मंजूर वन क्षेत्र १३ लाख ५७ हजार ६३ हेक्टर इतके आहे. देशात आपल्या राज्याने स्वतंत्रपणे पुढाकार घेत सकारात्मक निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

            जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सव..

  •          राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे             उद्घाटन
  •          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी भिलोरी भाषेत जनजातीय गौरव दिनाच्या व दिवाळीच्या आदिवासी बांधवांना                 शुभेच्छा देवून उपस्थितांची मने जिंकली.
  •          ‘आदिवासींचे अंतरंग’ या कॉफी टेबल बुकचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
  •           एकलव्य कुशल व आदिछात्रवृत्ती या पोर्टल्सचे लोकार्पण
  •          राज्यातील विविध आदिवासी नृत्यकलांचे झाले शानदार प्रदर्शन
  •          राज्यभरातील आदिवासी हस्तकला व आदिवासी खाद्यसंस्कृतीच्या प्रदर्शनाची तीन दिवस मेजवानी
  •          आदिवासी माहितीपट महोत्सवाचे विशेष आयोजन.
  •          दिव्यांग आदिवासी क्रीडापटू दिलीप महादू गावीत यांना यावेळी 5 लाखाचा धनादेश प्रोत्साहनपर देण्यात आला.
  •          रावलापाणी गावास सामुहिक वनहक्काचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

%d