fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

देशातील भगव्या छदमी राष्ट्रवादाला गांधी, नेहरूंच्या विचारांचेच उत्तर – डॉ. विश्वंभर चौधरी

पुणे – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गाधीजींची हत्या झाली. त्यावेळी देशाचे गृहमंत्री असलेल्या सरदार पटेलांनी संघावर घालण्यात आलेली बंदी पंतप्रधान नेहरूंनी उठवली ही नेहरूंची चूक होती. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. देशात छदमी राष्ट्रवाद पसरवला जात आहे. हे पसरवण्याचे काम करणारे सर्वजण कशाला घाबरत असतील तर ते सत्य आणि अहिंसा यांनाच घाबरतात. या छदमी राष्ट्रवादाला उत्तर द्यायचे असेल तर नेहरूं – गांधींच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विचारवंत सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी आज येथे केले.
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 133 व्या जयंतीनिमित्ता पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने “अधुनिक भारताचे शिल्पकार” या “पंडित नेहरूंच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन” सारसबागेजवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात भरवले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन केल्यावर डॉ.चौधरी बोलत होते. अध्यस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार होते. या प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला माजी महापौर कमल व्यवहारे, आबा बागूल, अजित दरेकर, नीता रजपूत, अविनाश बागवे, बंडू नलावडे, इंटकचे सुनिल शिंदे, शायनी नौशाद, संगीता तिवारीआदी आजीमाजी पदाधिका-यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नेहरूं – गाधी, पटेल – गांधी, नेहरू – पटेल यांच्यात मतभेद कसे होते हे लोकांच्यात पसरवले जात आहे असे सांगून डॉ. चौधरी म्हणाले, त्यांच्यात मतभेद होते कारण ते स्वतंत्र्यपणे विचार करणारे नेते होते. काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात अशी रचना होती की, पुढे काय करयचे हे गांधीजी ठरवत असत. ते संघटनेवर पकड असल्याने संघटनेत रूजवाचे काम सरदार पटेल करत आणि नेहरूंच्या करिश्म्यावर ते देशभर नेण्याचे काम होत असे. अशी कामाची विभागणी त्यांच्यात होती. पंडित नेहरूंना पंतप्रधान म्हणून देशात समुद्रीशास्त्र संस्था जी आज गोव्यात आहे, डिझाइनची राष्ट्रीय संस्था अहमदाबाद मध्ये सुरू केली. त्याचवेळी अणूशक्ती केंद्र उभे केले. एनडीए सारख्या संस्था सुरू केल्या. यातून त्यांची देश कसा असावा याबद्दलची दृष्टी दिसते. पंडित नेहरूंच्या मनात भारताची लख्ख प्रतिमा होती. नेहरूंचा उदय उत्तर प्रदेशातील तर पटेलांचा उदय गुजराथच्या शेतक-यांचे नेते म्हणून झालेला आहे. नेहरूंचे विचार, त्यांच्या दृष्टीकोन आणि कृती बघितली की राजघटनेचे प्रतिबिंबच नेहरूंच्या व्यक्तीमत्वात दिसते.
सरदार पटेल हे अहिंसेचे हिंसक प्रचारक तर पंडित नेहरू हे हिंसेचे अहिंसक प्रचारक असे महात्मा गाधी दोघांना म्हणत असत असे सांगून उल्हास पवार म्हणाले, पंडित नेहरूंना ऐन तारूण्यात स्वतंत्रता आंदोलनामुळे सतत कारावास होत असे. एकीकडे त्यांच्या पत्नी कमला नेहरू या असाध्या रोगाने सतत आजारी असायच्या. अशा परिस्थितीतही पंडित नेहरू आंदोलनातून मागे हटले नाहीत. अमेरिका आणि रशियच्या साम्राज्यावादाच्या विरोधात पंडित नेहरूंना अलिप्त राष्ट्रांची परिषद चार सदस्यांसह सुरू केली. नंतर 139 देश याचे सदस्य बनले. आज नेहरूंना जयंतीनिमित्त आदरांजली वाहत
असताना भारताने संयुक्त राष्ट्र संघात इस्त्रालयच्या विरोधात मतदान केल्याची बातमी येणे या नेहरूंच्याच विचारांचा विजय आहे.
या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, देशाला अहिंसेच्या मार्गानेच लढल्यामुळे स्वातंत्रय मिळाले आहे. गांधीजींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले तर पंडित नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात उभे होते. या स्वातंत्र्य लढ्यातील मूल्यांचे चित्रण देशाच्या राजघटनेत दिसते. स्वातंत्र्या नंतर पंडित नेहरूंनी देशाला काय दिले असा प्रश्न गेल्या काही वर्षात मोठ्याने विचारला जात आहे. त्याचे उत्तर आहे नेहरूंनी देशात लोकशाही प्रस्थापित केली. ती दीर्घकाळ टिकवण्यासाठीची पायाभरणी केली. मात्र आज त्या सगळ्या परिश्रमांची वाट लावण्याचे काम सुरू आहे. देशातील लोकशाही टिकवायची असेल तर गांधीजी, नेहरू आणि काँग्रेसचे विचार पुन्हा एकदा लोकांपर्यंत नेण्याचे व ते रूजवण्याची गरज आहे. आभार प्रदर्शन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले.
पंडित नेहरूंनी कृषी औद्योगिक समाज रचनेची पायाभरणी देशात कशी केली, त्याचवेळी भाभा अणूसंशोधन केंद्र, तसेच परदेशातील विविध राष्ट्राध्यक्ष, आईनस्टाईन यांच्या बरोबरची नेहरूंची छायाचित्रे यात बघायला मिळतात. देशात 1951 साली झालेल्या पहिल्यांदा आशियायी क्रिडा स्पर्धा, पुण्यात पूराच्यावेळी दिलेली भेट, युद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर युद्धभमीवरील सैनिकांची घेतलेली भेट असे अनेक प्रसंग या प्रदर्शनातून उलगडतात. हे प्रदर्शन बुधवारपर्यंत (दि.15) नागरीकांसाठी सणस मैदाना समोरील कै. बाळासाहेब ठाकरे कलादालनात दिवसभर खुले रहाणार आहे.

Leave a Reply

%d