Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

मतदार जनजागृतीकरीता स्वीप कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात मतदार नोंदणी जनजागृतीकरीता ‘पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ (स्वीप) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन मतदार नोंदणी करावी व इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत ४ व ५ नोव्हेंबर रोजी नोंदणीकृत सोसायट्या येथे मतदार नोंदणी विशेष शिबिरांचे आयोजन, ७ नोव्हेंबर रोजी सायकल फेरी, ८ नोव्हेंबर रोजी ग्रामीण मतदार संघात मंडळ व तालुका मुख्यालयात प्रभात फेरी व शहरी भागातील मतदासंघात लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या ठिकाणी प्रभातफेरीचे आयोजन, १८ व १९ नोव्हेंबर महिला, दिव्यांग नागरिकांसाठी तसेच सर्व महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या यांच्या सहकार्याने २० व २१ नोव्हेंबर रोजी स्थानिक पातळीवर जनजागृती व मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. औद्यागिक आस्थापना क्षेत्रात औद्योगिक विकास महामंडळ भागात २२ व २३ नोव्हेंबर रोजी जनजागृती व मतदार नोंदणी, २५, २६ व २७ नोव्हेंबर पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्रे, मॉल्स येथे पथनाट्य, भिंतीपत्रके, बॅनर लावून जनजागृती करण्यात येईल.

२८ व २९ नोव्हेंबर रोजी बांधकामाच्या ठिकाणी जनजागृती व मतदार नोंदणी, २ व ३ डिसेंबर तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन, दुर्गम भागातील आदिवासी गटातील मतदार नोंदणी शिबिराचे ५ व ६ डिसेंबर रोजी, ७, ८ व ९ डिसेंबर रोजी समाज माध्यम, पोस्टर स्पर्धा, लोकशाही भोंडला आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading