Saturday, September 19, 2026
Latest NewsPUNE

समाज घडविण्यासाठी कवींची भूमिका महत्वाची – डॉ. मनोहर जाधव यांचे विचार

पुणे : “अस्वस्थता चांगल्या साहित्य कृतीची निर्मिती करते. अस्वस्थतेतून जन्मलेली कविता समाजाला दिशादर्शक ठरते. कवींनी फक्त अस्वस्थ राहून चालणार नाही. आज अभिव्यक्ती खूप महत्वाची आहे. व्यक्त होणे ही आपली मूलभूत गरज असून कवितेच्या माध्यमातून व्यक्त होता आले पाहिजे. विकाररहित समाज घडविण्यासाठी कवींची भूमिका महत्वाची असते.” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केले.
साहित्यविश्व प्रकाशन, पुणे आणि अभिरुची प्रकाशन प्रकाशित मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे चे प्राचार्य. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या ‘झुळूक व स्पंदन’ या काव्यसंग्रहांच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ कवयित्री प्रा. हेमा लेले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. शामकांत देशमुख, साहित्यविश्व प्रकाशनाचे संस्थापक विक्रम मालनआप्पा शिंदे, अभिरुची प्रकाशनाच्या डॉ. वैजयंतीमाला जाधव हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालाचे प्राचार्य. डॉ. राजेंद्र झुंजारराव उपस्थित होते.
डॉ. मनोहर जाधव म्हणाले,” कविता किंवा कोणत्याही साहित्य कृतीमध्ये चांगुलपणाची तळमळ असते. नाट्य, काव्य आणि समाजाचे सौंदर्य फक्त कवीचं पाहू शकतो. डॉ. झुंजारराव यांच्या कविता मानवतेच्या विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या आहेत. जगण्याच्या सौंदर्याचं भावविश्व प्राचार्यांच्या कवितेत आहे. चिंतनातून मानसिक आरोग्य व सकारात्मक विचारांची प्रेरणा कवितेत असल्याने सर्वांसाठी उपयुक्त अशी ही पुस्तके आहेत.”
प्रा. हेमा लेले म्हणाल्या,” प्राचार्यांच्या कवितेत सहजता, वाचनीयता आणि गेयता आहे. त्यांच्या कवितेंची गाणी होऊ शकतात. कोणत्याही क्षणी दुःखावर फुंकर घालून निर्मळ आनंद देणाऱ्या सकारात्मक कविता ही झुंजाररावांना मिळालेली नैसर्गिक देणगीच म्हणावी लागेल. हरलेल्या व्यक्तीला नवा आशावाद देणारी आणि जीवनाकडे पारदर्शी पाहायला शिकवणाऱ्या कविता असून समाजमन जोडण्यासाठी नक्कीच उपयुक्त अशाच आहेत.”
प्रा. शामकांत देशमुख म्हणाले, ” संवाद हरवत चाललेल्या आजच्या काळात आपल्या सर्वांना भान देणाऱ्या ह्या प्राचार्यांच्या कविता आहेत. समाजाच्या आनंदाच्या चिंतनातून प्राचार्यांची कविता फुलली आहे. साध्या सरळ आणि तरल स्वभावामुळे त्यांच्या कवितेला आणि व्यक्तिमत्वाला बहर आला आहे.”
विक्रम मालनआप्पा शिंदे म्हणाले,” झुंजाररावांच्या कविता वाचकाला नवी दृष्टी देतात. जगण्याचा आशावाद आणि प्रयत्नांसाठी बळ देणाऱ्या कविता त्यांच्या लेखणीतून लिहल्या गेल्या आहेत. आज सर्वांनाच सकारात्मक व प्रेरणादायी विचारांनी गरज आहे. अशावेळी झुंजाररावांच्या कविता साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरतील.”
या प्रसंगी मुद्रित शोधक विजय जोशी व मुद्रक अविनाश काकडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. झुंजारराव लिखित प्रा. पुष्कर लेले व सुरज जायभाय स्वरबद्ध गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.डॉ. अंजली सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वैजयंतीमाला जाधव यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading