Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

नैतिकतेशिवाय यश फार काळ टिकत नाही – प्रवीण दीक्षित

पुणे : आजच्या काळामध्ये कोणत्याही मार्गाने पैसा कमविणे म्हणजेच यश मिळवणे अशा प्रकारची एक मनोवृत्ती ठसविली जात आहे. परंतु कमावलेल्या पैशाला जर नैतिकतेचे अधिष्ठान नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे त्याची परिणीती अखेर गुन्हेगारी मध्ये होते. नैतिकता नसेल तर यश फार काळ टिकत नाही, अशी भावना महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केली.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या वर्धापनदिनानिमित्त शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज आॅडिटोरियम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी आमदार मेधा कुलकर्णी, संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, ज्येष्ठ चित्रकार चारुहास पंडित, संस्थेचे अध्यक्ष विलास देशपांडे, कोषाध्यक्ष दिलीप संभूस, मंजुषा वैद्य, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, रोहित देशपांडे, मिलिंद दारव्हेकर, अंजली दारव्हेकर, मंदार महाजन, अभिजीत देशपांडे, अजय कुलकर्णी, चिंतामणी केळकर आदी उपस्थित होते.

सोहळ्यांतर्गत सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, कवी संकर्षण क-हाडे यांना व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार त्रिमूर्ती आॅटोडेको कॉम्पोनन्टस प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मकरंद जोशी यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रवीण दीक्षित म्हणाले, यश मिळवण्यासाठी तपश्चर्या आवश्यक असते. परंतु आजच्या तरुणांमध्ये बहुतांशी वेळा अधिक काळापर्यंत परिश्रम करत राहण्याची मानसिकता कमी होत आहे. त्यामुळेच विविध प्रकारचे शॉर्टकट आणि नक्कल करण्याचे प्रयोग दिसतात. कला असो अथवा उद्योग यामध्ये नक्कल करून काही ठराविक कालावधीपर्यंत यश मिळते. परंतु ते यश चिरकाळ टिकत नाही. नक्कल करण्यापेक्षा स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून वाटचाल केली, तर यश मिळते आणि ते दीर्घकाळ टिकते.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, सध्याच्या काळामध्ये तरुण परदेशामध्ये नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी जातात आणि तेथेच स्थायिक होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या देशातील बुद्धीमान तरुण ते सोडून जात आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या तरुणांना आपल्या देशामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करून या देशांमध्येच नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी आता वातावरण निर्माण होत आहे त्याचा तरुणांनी अधिकाधिक उपयोग करून घेतला पाहिजे.

संकर्षण क-हाडे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करत असताना तुमचे कौतुक करण्याबरोबरच तुमचे काय चुकत आहे, हे सांगणारी माणसे तुमच्या आजूबाजूला असणे आवश्यक आहे. त्यांच्यामुळे तुमचा तोल कधीही ढळला जात नाही. या पुरस्काराच्या उंची इतके काम आयुष्यभर करत राहणे आणि त्याला पात्र राहणे, हे माझ्यातील कलाकारासमोर आव्हान आहे.

मकरंद जोशी म्हणाले, मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले. परंतु माझ्या समाजाने दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे. समाज हा तुमच्या कायम पाठीशी आहे. आज यामागे संदेश आहे, कारण समाजाशिवाय कोणतेही व्यक्तीची प्रगती होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. मंदार महाजन, अभिजीत देशपांडे यांनी मानपत्र वाचन केले. सचिन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. आशिष कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading