The New Health Report : अधिक चांगले आरोग्य विमा कव्हरेज लक्झरी गोष्टींचा त्याग करण्यासाठी पुणेकर तयार.
पुणे : कोविड-१९ साथीमुळे संपूर्ण जगभरात घडून आलेल्या बदलांमुळे आरोग्याबाबत जागरूक जीवनपद्धतीला प्राधान्य देण्याचे महत्त्व सर्वांनाच ठळकपणे जाणवू लागले आहे. आरोग्य कल्याणाप्रती बांधिलकी जपण्यासाठी आणि ती दीर्घकाळपर्यंत कायम राखण्यासाठी, डिजिटल तसेच भौतिक जगात विविध चॅनेल्सचा शोध घेण्यात लोक सक्रिय पुढाकार घेत आहेत. कोविड-१९ साथीने देखील लोकांच्या सवयी, आचरणावर प्रभाव घडवून आणला आहे – वापरले जाणारे तंत्रज्ञान, आहाराबाबत जागरूकता, व्यायामातील नियमितता इत्यादी अनेक गोष्टींमध्ये लक्षणीय बदल घडून आले आहेत. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने प्रकाशित केलेल्या द न्यू हेल्थ नॉर्मल रिपोर्टमध्ये हे ठळकपणे दिसून आले आहे. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही आघाडीचा नॉन-बँक फायनान्शियल सर्व्हिसेस समूह आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडमधील आरोग्य विमा उत्पादने, सेवासुविधा देणारी उपकंपनी आहे.
तब्येतीच्या बाबतीत अचानक काही समस्या उद्भवल्यास त्याचे निवारण करण्यासाठीची आर्थिक क्षमता मिळवणे हा कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा एक प्रमुख भाग बनला आहे, हा साथीनंतरच्या काळात घडून आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल आहे. हे नवे वास्तव पुणेकरांनी कशाप्रकारे स्वीकारले आहे याबाबतची महत्त्वाची माहिती एबीएचआयसीएलच्या न्यू हेल्थ नॉर्मल रिपोर्टमध्ये मिळाली आहे. या अहवालानुसार, पुण्यामधून या संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी फक्त २५% जणांनी आर्थिक आणीबाणीसाठी पुरेसा पैसा बाजूला काढून ठेवलेला आहे, तर राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण ५२% आहे. याखेरीज पुण्यातील ९२% पुरुषांना (या संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी) खात्री नाही की त्यांच्याकडे असलेली बचत ही आणीबाणीसाठी पुरेशी आहे अथवा नाही, राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण ४१% आहे. पुण्यामध्ये ८८% लोक अशा कंपन्यांमध्ये नोकरी करणे पसंत करतात जिथे कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चांसाठी विमा काढून दिला जातो. पुण्यातील ४९% आणि राष्ट्रीय पातळीवरील ३३% महिला वैद्यकीय खर्चांसाठी पूर्णपणे त्यांच्या कंपनीवर (जिथे त्या नोकरी करतात) अवलंबून आहेत.
एबीएचआयसीएलच्या न्यू हेल्थ नॉर्मल रिपोर्टमधून समोर आलेली, विचार करायला लावणारी आणखी एक माहिती म्हणजे, ‘न्यू हेल्थ नॉर्मल’मध्ये अर्थात साथीनंतरच्या काळात पुण्यातील ८५% व्यक्ती (या संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी) एखादी लक्झरी वस्तू खरेदी करण्याऐवजी आरोग्य विमा खरेदी करण्याला प्राधान्य देतात. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण ८४.५% आहे. यावरून दिसून येते की पुणेकर त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देतात व पुरेसे आरोग्य विमा कव्हरेज मिळवण्यासाठी त्याग करायला देखील तयार आहेत.
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे सीईओ मयांक बाठवाल यांनी या संशोधनाबाबत सांगितले, “साथीनंतरच्या काळातील ‘न्यू हेल्थ नॉर्मल’मध्ये लोकांना आरोग्यकेंद्रित जीवनशैलीचे महत्त्व समजून येत आहे आणि अशा जीवनशैलीचे आचरण करण्यासाठी, तिला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे ऑनलाईन व ऑफलाईन मार्ग ते शोधून काढत आहेत. त्यांच्या सवयी, आचरणावर खूप मोठा प्रभाव पडला आहे – वापरले जाणारे तंत्रज्ञान, आहाराबाबतची जागरूकता, व्यायामातील नियमितता इत्यादी अनेक गोष्टींवर हा प्रभाव ठळकपणे दिसून येत आहे. पण नवी सवय लावून घेणे हे खूप लोकांसाठी एक आव्हान असते, आरोग्यदायक जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे.”
पुणेकरांचा व्यायामाकडे कल
एबीएचआयसीएलच्या न्यू हेल्थ नॉर्मल रिपोर्टमधून दिसून आले आहे की, पुणेकरांचा व्यायामाकडे कल आहे पण त्यांनी अजून जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या अहवालानुसार, पुण्यामधून संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी ८५% पुरुष त्यांच्या आरोग्याविषयीच्या आकडेवारीवर सतत लक्ष ठेवून असतात, राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण ६६% आहे. कोविड-१९ साथीनंतर, पुण्यातील ३५ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींपैकी ४४% व्यक्ती (संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी) आपण दररोज किती पावले चाललो यावर नियमितपणे लक्ष ठेवतात, तर राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण ६८% आहे.
फिटनेस शौकीन पुणेकरांनी आरोग्यकेंद्रित सामग्री वापरण्याच्या पारंपारिक पद्धतीऐवजी घरगुती फिटनेस उपकरणे वापरण्याला प्राधान्य दिले आहे. पुण्यातून या संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी ६९% व्यक्तींनी ओटीटीवर फिटनेस क्लासेस, युट्युब व्हिडिओ, व्यायाम/योगाशी संबंधित शो शोधले आहेत. राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण ६०% आहे.
पुण्यात मानसिक आरोग्याविषयी जागरुकता वाढत आहे, पण मानसिक समस्या हा कलंक मानला जाण्याची प्रवृत्ती निवारक मदत मिळविण्याच्या मार्गातील एक अडथळा ठरत आहे.
कोविड-१९च्या साथीसोबत अनिश्चितता व चिंता या दोन समस्या देखील सर्वत्र पसरल्या, त्यामुळे मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाऊ लागले आहे. तणावाचे कारण, चिंता आणि त्यावर उपलब्ध असलेल्या उपायांबद्दल आणि व्यावसायिक मदत कुठे घेतली जाऊ शकते याविषयी बोलण्यासाठी लोक पुढे येत आहेत.
या अहवालात पुणे शहरातील मानसिक आरोग्य जागृतीच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. निष्कर्षांनुसार, पुण्यातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ९२% व्यक्तींचा असा विश्वास आहे की आरोग्य विमा पॉलिसीमध्ये मानसिक आरोग्य कन्सल्टिंगचा समावेश केला पाहिजे, राष्ट्रीय स्तरावर हेच प्रमाण ८९% आहे. मिलेनियल्स आणि जेन झेड मानसिक आरोग्याविषयी सक्रियपणे जागरूकता पसरवत आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील जागरूकता वाढली आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील ६५% व्यक्ती अजूनही मानसिक आरोग्य तज्ञांना भेट देण्यास संकोच करतात, इतर लोक आपल्याला काय म्हणतील याची त्यांना खूप काळजी वाटते, राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाणात ६८% आहे. त्यांचा हा संकोच मानसिक आरोग्याच्या समस्यांना कलंक मानण्याच्या प्रवृत्तीचे प्रतिबिंब आहे, याचमुळे अनेक लोक आवश्यक ती काळजी घेण्यात असमर्थ आहेत. एबीएचआयसीएलचा असा विश्वास आहे की मानसिक आरोग्याविषयी लोकांना सतत शिक्षित करून आणि मदत मिळविण्याशी संबंधित भीती आणि लाज कमी करून, मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झगडत असलेल्यांसाठी अधिक सहाय्यक वातावरण तयार केले जाऊ शकते.
