ब्रुसेल्समध्ये साजरा झाला नवरात्रीचा उत्सव
पुणे : बेल्जियम ब्रुसेल्स मधल्या झावेंटम येथे भारतीयांनी तसेच परदेशी नागरिकांनी एकत्र येत नवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा केला. भारतीय आणि परदेशी नागरिकांनी भारताच्या उत्सव परंपरेसह, गरबा-दांडिया खेळत आणि खाद्यपदार्थांचा देखील आस्वाद घेतला. देवीची आरती करून उत्सवाला सुरुवात झाली. भारतीय पारंपरिक वेशात सहभागी होत सांस्कृतिक समरसतेचा आनंद उपस्थितांनी घेतला. (Navratri festival celebrated in Brussels)
महाराष्ट्राच्या तृप्ती वाघमारे या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत नवरात्रीमध्ये दरवर्षी गरबा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करतात. यंदा ५०० पेक्षा अधिक लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. संगीत नृत्य बरोबर भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील तेथील नागरिकांनी घेतला.
गरबा क्विन, गरबा किंग, बेस्ट ड्रेस मेल फिमेल, फिमेल बेस्ट डान्सर अशी बरीचशी बक्षीसे यावेळी देण्यात आली. लहान मुलांनी देखील कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला, त्यांनाही यावेळी बक्षीसे देण्यात आली.
तृप्ती वाघमारे या आयटीमध्ये काम करतात. काही वर्षांपूर्वी इंडियन लेडीज असोसिएशन बेल्जियम या संस्थेची स्थापना त्यांनी केली. ही संस्था भारतीय महिलांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी काम करते.
तृप्ती वाघमारे म्हणाल्या, भारतामध्ये सगळे सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. देशापासून दूर असल्यामुळे भारतातील उत्सवाचा आनंद अनेकांना घेता येत नाही. त्यामुळे दरवर्षी नवरात्रीचा उत्सव ब्रुसेल्समध्ये साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने भारताची संस्कृती जगभरात पोहोचत आहे. नवरात्री सोबत गणेश उत्सव देखील उत्साहात साजरा करण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.
