Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

अनेकांचे हात एकत्र आले तर समाजासाठी चांगले काम होणे सहज शक्य -अरुणा कटारा

पुणे :  समाजातील प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे चांगले काम केले, तर चांगल्या कामाचा डोंगर उभा राहू शकतो. अशाच प्रकारे अनेकांचे हात एकत्र आले तर समाजासाठी चांगले काम होणे सहज शक्य आहे. या चांगल्या कामाकरिता श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरातील सकारात्मकतेमुळे सर्वांना उर्जा मिळते. श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली अशी देवीची तिन्ही रुपे एकाच ठिकाणी आपल्याला पहायला मिळतात व दर्शन घेता येते, असे होम फाऊंडेशन व रिसर्च सेंटरच्याच्या अरुणा कटारा यांनी सांगितले.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा नारी तू नारायणी पुरस्कार देऊन मंदिरात सन्मान करण्यात आला. यावेळी पर्सिस्टंट चे आनंद देशपांडे, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

दिव्यांग कथक नृत्यांगना सायली आगवणे, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या मीता बॅनर्जी, पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, महावस्त्र, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी सायली आगवणे हीच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.

मीता बॅनर्जी म्हणाल्या, भूमातेची सेवा करण्याचे काम आमच्याकडून सुरु आहे. ज्या भूमातेवर आपण दररोज पाय ठेवतो, त्या भूमीची स्वच्छता आपण करायला हवी. तिची स्वच्छता आणि सेवा केल्यास सर्वत्र चांगले वातावरण निर्माण होईल. तसेच प्रत्येकाचे जीवन आनंदी व सुखकर होऊ शकेल.

विश्वस्त तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, विविध क्षेत्रात उच्चपदस्थ महिला असून अनेकजणी वेगळ्या प्रकारचे काम समाजात करीत आहेत, त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा. नारी तू नारायणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशाच आदर्शवत महिलांच्या सन्मान करण्यासोबतच त्यांच्या हस्ते देवीची आरती केली जाईल. गेली अनेक वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. विश्वस्त प्रविण चोरबेले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading