एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया च्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनव रबर पॉवर विमान स्पर्धेचे आयोजन
पुणे : एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (AeSI) संस्थेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त AeSI पुणे विभाग आणि सिंबायोसिस विद्यापीठ तर्फे अभिनव रबर पॉवर विमान स्पर्धा आयोजित केली आहे.
रबराला पीळ देऊन साधारण ८ ते १० ग्रॅम वजनाचे विमान जास्तीत जास्त कालावधीसाठी उडवणे हे स्पर्धेचे स्वरूप आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्पर्धाना F1D क्लास या प्रकारची स्पर्धा म्हणतात व एरो मॉडेलिंग मधील ही सर्वात
कठीण आणि क्षमतेचा कस पाहाणारी स्पर्धा मानली जाते. भारतात अशी स्पर्धा प्रथमच आजोजित केली जात आहे.
विमानशास्त्र या विषयात गेली ४० वर्षे काम करणारे श्री. माधव खरे यांच्या मार्गदर्शनाखाली च एम आय टी विद्यापीठ, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ कॉलेज आणि पुणे एव्हिएशन टेक्नॉलॉजी या चार संस्थातील कॉलेजमधील साधारणपणे एकूण १७० टीम या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यासाठी या संस्थांमधे विशेष
कार्यशाळांचे आयोजन AeSI ने केले होते. सिंबायोसिस विद्यापीठाच्या लवळे येथील प्रशस्त जागेमधे या स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
जगभरात या प्रकारची विमाने बनवण्याच्या स्पर्धा आग्रहाने घेतल्या जातात कारण यामधील जवळजवळ प्रत्येक गोष्ट स्पर्धकाला स्वतः तयार करावी लागत. यामुळे भरपूर चिकाटी व जिद्द निर्माण होते. हस्त कौशल्य आणि एकाग्रता मोठ्या प्रमाणावर वाढते आणि विज्ञान, भूमिती, स्ट्रक्चर्स, पॉवर मॅनेजमेंट तसेच विमानशास्त्रातील मूलभूत संकल्पना यांचे खोलवर आकलन विद्यार्थ्यांना होते. अशा स्पर्धा जगातील सर्व प्रगत राष्ट्रांमधे शालेय पातळी पासून घेतल्या जातात कारण असे प्रशिक्षण घेतलेली व्यक्ति कोणत्याही क्षेत्रात जिद्दीने यश मिळवते असे त्यांचे निरीक्षण आहे.
अंतिम फेरीमधील एकूण ११ संघाना रोख पारितोषके दिली जाणार आहेत तसेच प्रथम तीन संघांना दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय परिषदे मध्ये याविषयी चे प्रात्यक्षिक आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
येत्या काही वर्षात पुण्यातील विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवा यासाठी ए ई एस आय प्रयत्नशील राहील असे संस्थेचे अध्यक्ष व HEMRL चे डायरेक्टर डॉ. ए. पी. दास यांनी सांगितले.
स्पर्धेची वैशिष्टे
- भारतात अशा प्रकारची स्पर्धा प्रथमच आयोजित.
- हस्त कौशल्य आणि शास्त्रीय दृष्टीकोन वाढीस लागतो.
- स्पर्धकांत जिद्द आणि चिकाटी निर्माण होते.
- १७० संघाचा सहभाग
- रोख रकमेची पारितोषिके
- विजेत्या स्पर्धकांना दिल्लीतील मुख्य परिषदेत प्रात्यक्षिक आणि कौशल्य दाखवण्याची संधी.
- विजेत्या स्पर्धकांचा दिल्लीचा खर्च AeSI संस्था करणार.
