हडपलेल्या वतनाच्या जमिनी मिळवण्यासाठी एकत्र यावे – आनंदराज आंबेडकर
पुणे : “आपल्या पूर्वजांनी शौर्य गाजवल्यामुळे महार वतनातून आपल्याला मिळालेल्या जमिनी सरकार, बिल्डर, सावकारांनी कमी किमतीत हडप केल्या. त्यामुळे आपण केवळ नामधारी वतनदार झालो आहोत. शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याकरता आपल्या जमिनी पुन्हा मिळविल्या पाहिजेत प्रसंगी कायदेशीर मार्गाने व रस्त्यावरची लढाई करावी लागेल. पेशवाईने अन्यायाचा कहर केला होता; त्याच पुण्यातून हा महार वतनाच्या न्याय हक्काचा लढा लढला जातो आहे. हडप केलेल्या या जमिनी परत मिळवण्यासाठी लढा उभारायला हवा. त्यासाठी सर्व समाजबांधव एकत्र येणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन आनंदराज आंबेडकर यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे बहुजन रिपब्लिकन विकास आघाडीच्या वतीने महार वतन अधिकार परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आंबेडकर बोलत होते. विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी हुलगेश चलवादी, ऍड. राजेश झालटे, विवेक बनसोडे, पल्लवीताई जावळे, पांडुरंग शेलार, दिलीपराज गायकवाड, सत्यशोधक चित्रपटाचे प्रवीण तायडे, रमेश गायकवाड उपस्थित होते.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, “तुम्ही ज्या दिवशी एकत्र याल, त्या दिवशी तुम्ही राजे व्हाल. राज्यात अनेक ठिकाणी असलेल्या इनामी जमिनी बळकावलेल्या आहेत. काहीजण कमी किमतीत जमिनी विकत आहेत. तसे करू नका. खासगीकरण होत आहे. तसेच नोकऱ्याही कमी होत आहेत. त्यामुळे समाजाच्या किकासासाठी महार वतनातील जमिनी मिळविल्या पाहिजेत. सरकार दरबारी प्रश्न सोडविण्यासाठी गटातटाचे राजकारण सोडून एकत्र यायला हवे.”
डॉ. प्रशांत पगारे म्हणाले, “महार वतन लढा आनंदराज यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे हा लढा यशस्वी होणार, यात शंका नाही, समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र आले पाहिजे. सत्ता कोणाचीही असो, काही फरक पडत नाही. हक्कासाठी लढा, लढल्याशिवाय आपले हक्क कोणी देत नाही.”
ऍड. राजेश झालटे म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला महार वतन मिळवून दिले. परंतु सावकार, सरकार यांनी कमी किमतीत जमीन हडपली. परंतु महार समाजाला भूमिहीन करता येत नाही.”
हुलगेश चलवादी म्हणाले, “महार वतन हा विषय फक्त पुण्याचा नसून, संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. आपल्या जमिनीत सर्व सरकारी कार्यालये आहेत. त्या जमिनी परत मिळण्यासाठी संपूर्ण समाज एकत्र यावा.”
स्वागत-प्रास्ताविक शेखर जावळे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. प्रसिद्ध गायक विजय कावळे व सहकाऱ्यांनी संविधान जलसा सादर केला.
