Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशाचा जीपीएस निर्देशांक घसरत असताना, ‘महासत्ते’चा गाजावाजा निरर्थक – डॉ. गणेश देवी यांचे मत

पुणे  : मानवाधिकार, मानव विकास, भूक, गरिबी, शिक्षण.. अशा अनेक निकषांवर देशाचा निर्देशांक घसरत आहे. ही वस्तुस्थिती डावलून ‘महासत्ते’चा गाजावाजा करणे निरर्थक आहे, असे परखड मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि समीक्षक डॉ. गणेश देवी यांनी रविवारी मांडले. ‘देशाची आधुनिकता, प्रगती, विकास या संज्ञांकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, हे विवेकबुद्धी ठरवते. एखादी संकल्पना, नवकल्पना झपाट्याने प्रसारित होते आणि तीच बदलासाठी कारणीभूत ठरते. मनोविकास प्रकाशनच्या ‘बदलता भारत : पारतंत्र्याकडून महासत्तेकडे’ या महाग्रंथातून या बदलांचे परिप्रेक्ष्य तर वाढेलच पण काही उपाययोजनाही गवसतील, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

मनोविकास प्रकाशन व एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मनोविकास प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे’ हा महाग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला.

राज्य विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित, महाग्रंथाचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता देसाई, प्रकाशक अरविंद पाटकर, सहसंपादिका संयोगिता ढमढेरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ‘बदलता भारत – आजचा आणि उद्याचा’ या विषयावर मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. इतिहास अभ्यासक डॉ. जास्वंदी वांबूरकर आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा श्रीरंजन आवटे यांनी मान्यवरांशी संवाद साधला.

प्रस्तुत ग्रंथ १९४७ च्या आधी आणि नंतरच्या सुमारे दोनशे वर्षांच्या सामाजिक मानसिकतेवर प्रकाश टाकणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे, असे सांगून डॉ. देवी म्हणाले, “संवाद हा राज्यघटनेचा पाया आहे. प्रस्तुत ग्रंथही हे सांगतो. भाषिक वैविध्य महत्त्वाचे आहे. ते नाकारणे घटनाविरोधी आहे. बदल, स्थित्यंतर आणि परिवर्तन, या पद्धतीनेच देशाची वाटचाल होत असते. नवे शैक्षणिक धोरण शिळ्या कढीला ऊत आणल्यासारखे आहे. त्यामध्ये खऱ्या भारतीय ज्ञानपरंपरेला स्थान नाही. भारतीय ज्ञानासह डार्विन शिकणेही महत्त्वाचे आहे”

“देश प्रगती नक्की करत आहे, पण त्याचे श्रेय एक पक्ष, एक व्यक्ती यांना नाही. ते भारतीयांचे श्रेय आहे. विविधतेतील एकतेचे हे श्रेय आहे. भौतिक प्रगतीला नैतिकता आणि मूल्यांची साथ हवी, हे आपले वेगळेपण आहे. नुसते शाब्दिक गौरवीकरण, स्मरणरंजन उपयोगाचे नाही, तर जनसमूहांच्या समग्र इतिहासाचा परामर्श हा ग्रंथ घेतो,” असे डॉ. राजा दीक्षीत यांनी सांगितले.

संपादक देसाई म्हणाले, “प्रागतिक विचारसरणींनी चाकोऱ्या, साचे तोडून परिपक्व, एकात्मिक दृष्टी स्वीकारली पाहिजे. त्यातून देशाच्या राजकारणाला नवे वळण मिळेल.”

अरविंद पाटकर म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करताना, यापलीकडे आणि अलीकडेही बरेच काही घडले, याचा विचार प्रस्तुत ग्रंथात केला आहे. या द्विखंडात्मक महाग्रंथात ६० विषय ६० विशेषज्ञांनी मांडले आहेत. तज्ज्ञांचे लेखन, साक्षेपी संपादन, उत्कृष्ट निर्मितीमूल्ये जपत हा महाग्रंथ सिद्ध केला आहे.” सहसंपादक संयोगिता ढमढेरे यांनी ग्रंथाच्या निर्मितीप्रक्रियेची माहिती दिली. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading