महालक्ष्मी मंदिरात देवी स्वरूप असलेल्या मुलींचे कन्यापूजन
पुणे : या देवी सर्वभूतेषु, शक्ती रुपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:… या मंगल स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. देवीनामाचा जयघोष करीत देवीस्वरुप असलेल्या लहान मुलींनी आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहिले आणि त्यावेळी प्रत्येक चिमुकलीच्या चेहऱ्यावर आनंद काहीसा वेगळा होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन, औक्षण करुन त्यांना भेटवस्तू देखील दिल्या.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात पुणे मनपा शाळेतील आणि देवदासिंच्या मुलींच्या कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, नृत्यांगना वैष्णवी पाटील, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, शिरीष मोहिते, निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. कन्यापूजनानंतर ट्रस्टतर्फे सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य, खाऊ व भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणा-या मातांची रुपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींंमध्ये ही रुपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरुप असते. मात्र, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. खूप शिकून मोठे व्हायला हवे. तरच देवी प्रसन्न होईल. कुटुंबात मुलगी होणे, ही गर्वाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.
