प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
जपान येथील कोबे शहरात भारत-जपान यांच्यातील कला आणि खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित ‘इंडिया मेला’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जपानचे उच्चायुक्त सिविजाज, कोबेचे उपमहापौर काजुनरी उहारा, तेजसिनियमशिता, निखिलेश गौरी, राम कलानी, भावेन जवेरी, चेंबर ऑफ कॉमर्सचे जॉनी लालवाणी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भारत नेहमीच जपानशी मैत्रीपूर्ण संबंध जपून ठेवत आला आहे. अध्यात्मिक दृष्टिकोनातून भारत आणि जपान यांच्यात प्रेमाचे संबंध राहिले आहेत. ‘युद्ध नको बुद्ध हवा’ अर्थात ‘जियो और जिने दो’, असा संदेश देणारे बुद्धिझम भारतातून जपानमध्ये आले आहेत. हा विचार जपानच्या घराघरात आणि मनामनात पोहोचविण्याचा जपानने सातत्याने प्रयत्न केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी लढणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना साथ देणारा हा देश आहे. टोकियो शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं मंदिर याची साक्ष देत आहे. संस्कृती आणि परंपरा ही जीवन जगण्याची कला आहे. संस्कृती ही मनाच्या समाधानाचे उत्तम साधन आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघ देखील कोणता देश किती धनवान आहे यापेक्षा तो किती गुणवान आहे या आधावर त्या देशाच्या आनंदाची व्याख्या निश्चित करीत आहे, असेही ते म्हणाले.
जपानी भाषेत भाषणाची सुरुवात
मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भाषणाची सुरुवात जपानी भाषेत केली. जपानी बांधवांना भेटण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद झालाय, सर्वांशी संवाद साधता आला याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा अभिमान
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे जपानमध्ये सादरीकरण झाल्याचा राज्याचा मंत्री म्हणून मनापासून आनंद झाला आहे. महाराष्ट्राच्या कलाकारांनी अतिशय उत्साहाने कार्यक्रम सादर केले. त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या कार्यक्रमामुळे जपानच्या कोबे शहरातील कला रसिकाच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह बघून आनंद वाटतोय असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.
