Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या हातांचा सन्मान

पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने पुण्याच्या गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या हातांचा सन्मान करण्यात आला. अग्निशमन दलातील अधिकारी, जीव रक्षक आणि ज्यांच्या सहकार्याने गणेशोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला अशा सर्व पडद्यामागील व्यक्तींना सन्मानचिन्ह ,शाल, श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
आमदार माधुरी मिसाळ आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. यावेळी ललित जैन, किशोर सरपोतदार, रामदास तुळशीबागवाले , सुभाष सरपाले, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित,दत्तात्रय कावरे,मोहन साखरीया मयूर दिवेकर, साई डोंगरे, प्रदीप इंगळे, किरण चौहान उपस्थित होते.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुण्याचा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेकांचे योगदान असते. त्यामध्ये स्वच्छता कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी यांचे कार्य निश्चितच महत्त्वाचे आहे. आपल्या जीवाची काळजी न करता अग्निशमन दलाचे अधिकारी काम करत असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.
हेमंत रासने म्हणाले, सर्व समाजाला हवा असणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आहे. सर्व जाती-धर्माचे लोक उत्साहाने यामध्ये सहभागी होतात. खऱ्या अर्थाने समाज संघटित करणारा हा उत्सव आहे. अनेक कार्यकर्ते या उत्सवाने घडवले. जगातील १६० देशात हा उत्सव साजरा केला जातो. ज्या लोकांच्या योगदानातून हा उत्सव साजरा केला जातो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
अग्निशमन दल अधिकारी, जीव रक्षक, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह वाद्यपथकतील वादक, सजावट कलाकार, मांडववाले, पौरोहित्य करणारे गुरुजी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. विनायक कदम यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading