आपली गुणवत्ता वाढवून प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यायला हवे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांचे मत
पुणे : आपला समाज आज जसा आहे त्यापेक्षा भविष्यात वेगळा असणार आहे. या बदलत्या समाजात आपले काय योगदान असणार आहे याचा आपण विचार करायला हवा. प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी व्यवस्थित पार पडली तर प्रत्येकाची प्रगती होईल आणि राष्ट्राची देखील प्रगती होईल. आपली गुणवत्ता वाढवून प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यायला पाहिजे. असे मत परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूकीदरम्यान आणि गणेशोत्सवात शहर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गणेशोत्सवात पौरोहित्य करणाऱ्या वेदमूर्तींचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, विश्वास भोर उपस्थित होते. सन्मानपत्र,शाल, भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मान सोहळ्याचे यंदा २६ वे वर्ष आहे.
संदीप सिंग गिल म्हणाले, सफाई कर्मचारी आणि पौरोहित्य करणारे वेदमूर्ती यांचे उत्सवात खूप मोठे योगदान असते. संपूर्ण उत्सवात ते १२ तासांपेक्षा अधिक काळ कार्यरत असतात. अखिल मंडई मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान होणे कौतुकास्पद आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाला महत्त्व देण्यासाठी असे कार्यक्रम अजून व्हायला हवेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. पराग काळकर म्हणाले, केवळ गणेशोत्सवातच नाही तर वर्षभर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता दूत काम करत असतात. आपण सगळेजण समाजाचे घटक आहोत यातील प्रत्येक जण समान आहे, फक्त प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. प्रत्येकाने आपली भूमिका चोखपणे केली तर समाजातील समस्या कमी होईल आणि समाज आनंदी होईल.
अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्वच्छता कर्मचारी. दिवस-रात्र शहराची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच प्रसन्न वातावरणात आपण उत्सव साजरा करू शकतो. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून अखिल मंडई मंडळाच्या वतीने दरवर्षी सफाई कामगारांचा सन्मान करण्यात येतो. त्यांच्यासोबतच उत्सवात महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या वेदमूर्तींचा देखील यंदा सन्मान करण्यात आला. आनंद सराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
