‘आदिशक्ती’ रंगावली प्रदर्शनात साकारली देवीची विविध रुपे
पुणे : शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा या देवीच्या रुपांसह पुण्याचे ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी, नाशिकची सप्तशृंगी, माहूरची रेणुकामाता, कोल्हापूरची अंबाबाई अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या देवीचे रुप आदिशक्ती रंगावली प्रदर्शनात साकारण्यात आले आहे. रंगावलीकार शारदा अवसरे यांच्यासह ३० कलाकारांनी तब्बल १८ रंगावलींच्या माध्यमातून देवीच्या विविध रुपांची महती उलगडली आहे.
बालगंधर्व कलादालन येथे आयोजित प्रदर्शनाचे उद््घाटन प्रख्यात रंगावलीकार जगदीश चव्हण, अक्षय शहापूरकर, प्रतीक अथाने, कथक नृत्यांगना नेहा मुथियान यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदर्शनाच्या आयोजिका रंगावलीकार शारदा अवसरे आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक ५ आॅक्टोबर पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत बालगंधर्व कलादालन येथे पुणेकरांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
जगदीश चव्हाण म्हणाले, रांगोळी ही भारतीय कला आहे. एक रांगोळी काढण्याकरिता खूप कष्ट लागतात. किमान ७ ते ८ तास एका ठिकाणी सलग मांडी घालून बसावे लागते. मात्र, कलाकृती पूर्ण झाल्यावर मिळणारे मानसिक समाधान खूप मोलाचे असते. त्याची तुलना कोणत्याही गोष्टीही होऊ शकत नाही. त्यामुळे यांसारखे प्रदर्शन ठिकठिकाणी व्हायला हवे.
शारदा अवसरे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे देवी-देवता. त्यामुळे रंगावली कलाकारांनी अशीच देवीची विविध रूपे रंगावलीच्या माध्यमातून साकारली आहेत. देवीच्या रूपांची महती सांगणारे ‘आदिशक्ती’ हे प्रदर्शन आहे. नवरात्रीमधील देवीची ९ रूपे आणि दररोजच्या पूजेतील ९ देवीची रूपे रंगावलीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहेत.
यामध्ये स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री यांसह तुळजाभवानी, सरस्वती देवी, दुर्गा देवी, महाकाली आणि महिशासूरमर्दिनी या देवीच्या विविध रुपांची रंगावली आहे. सर्व रंगावली काढण्याकरिता एकूण ३० किलो रंगावली व रंगाचा वापर करण्यात आला आहे. प्रदर्शनाकरिता श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे प्रतीक अथाने आणि गोल्डन ड्रिप अँड अॅग्रो अलाईड, पुणे चे आशुतोष बगाडे यांनी विशेष सहकार्य केले आहे.
फोटो ओळ : रंगावलीकार शारदा अवसरे यांच्यासह ३० कलाकारांनी तब्बल १८ रंगावलींच्या माध्यमातून देवीच्या विविध रुपांची महती उलगडली आहे. आदिशक्ती हे रंगावली प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले असून दिनांक ५ आॅक्टोबर पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत पुणेकरांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
