वारकरी संमेलन ही संकल्पनाच मुळी समतेचा, माणुसकीचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त आहे – शरद पवार
जुन्नर : वारकरी संमेलन ही संकल्पनाच मुळी समतेचा, माणुसकीचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यासाठी हा पुढाकार या ठिकाणी घेतला गेला. मला त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की, आज समाजामध्ये ज्याप्रकारे अस्वस्थता आहे, चुकीची प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची भूमिका काही घटक घेतात त्यामुळे सामान्य माणूसाची अस्वस्थता काढून टाकण्यासाठी, त्याला मानसिक समाधान देण्यासाठी, त्याचं मन शक्तिमान करण्यासाठी जे काही पर्याय आज समाजासमोर आहेत त्यामध्ये वारकरी संप्रदायाचा विषय आणि विचार हा आपण दुर्लक्षित करू शकत नाही ते सूत्र घेऊन गेले काही तास आपण या ठिकाणी बसलो. हेच सूत्र घेऊन उभं आयुष्य समाजाचं मन तयार करण्याची कामगिरी करणारे जे कुणी असतील, कीर्तनकार असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांचं जे योगदान आहे त्यांच्या योगदानाचा सन्मान आज या ठिकाणी करण्यासंबंधीचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, तुम्हा सर्वांना मी अंतःकरणापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. अशी भावना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलासराव लांडे. वारकरी संमेलनाचे अध्यक्ष ह.भ. प. दिनकर शास्त्री, विकास लवांडे, ह. भ. प. श्याम सुंदर महाराज आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आपण काही पुस्तके प्रकाशित केली. दिनकर शास्त्रींनी वारकरी वैष्णव संप्रदाय नावाचं पुस्तक लिखित केलं. तुमच्या सर्वांच्या साथीने त्याचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. दुसरं एक पुस्तक स्त्री वर्गाचा सुवर्णकालीन हा इतिहास लिखित स्वरूपामध्ये मांडण्याचं काम प्रियंका रंजन रामराज चौधरी यांनी केला. स्त्रियांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तुत्व दाखवलं यासंबंधीचा लिखाण त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून करून स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा हा प्रागतिक कसा राहील या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी ग्रंथाच्या माध्यमातून घेतली. या ग्रंथाचंसुद्धा प्रकाशन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो.
आज सबंध देशामध्ये वेगवेगळी घटक वेगवेगळ्या पद्धतीने आपली पावले टाकत आहेत. पण दुसऱ्या बाजूने अन्याय, अत्याचार हे चित्र एका बाजूला आणि धर्म, विचारांच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टींचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळते. माझ्या मते, कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचा पुरस्कार कधी करत नाही, चुकीचे संस्कार कधी समाज बांधवांवर करत नाही योग्य विषय देण्याच्या संबंधीची खबरदारी ते घेतात. या ठिकाणी आधी अनेकांचे विचार आपण ऐकले त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, हा देश अनेक जाती-धर्माचा व भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार जो आहे तो विचार हिंदूंचा असो किंवा मुस्लिमांचा असो, अन्य घटकांचा असो त्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका ही प्रकर्षाने मांडली जाते. त्याचाच पुरस्कार करणं व ते रुजवणं आणि ते शक्तिशाली करणं खऱ्या अर्थाने याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता भागवत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजवू शकतो याची मला खात्री आहे.
आज अनेक वर्षांपासून आपण बघतो माऊलींचं दर्शन घेतलं किंवा देहूला जाऊन तुकारामांचं दर्शन/; घेतल्यानंतर उन्हातान्हाचा विचार न करता वर्षानुवर्षे अन् पिढ्यानपिढ्या अनेक लोकं पंढरीची वारी करत असतात. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात आणि त्यातून त्यांना एक प्रकारचा समाधान प्राप्त होत असतो. हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूने देश आणि समाजाचे सामाजिक जीवनावरच्या पातळीवर जाईल कसं या प्रकारची सुद्धा खबरदारी आपण कळत-नकळत घेत असतो. मी अनेक ठिकाणी उदाहरण सांगितलं. मला आठवतंय की, पुणे जिल्ह्याच्या आणि सोलापूरच्या सीमेवर एक धरण आहे त्या धरणाचं नाव उजनी. उजनी धरणाचं जेव्हा बांधकाम पूर्ण झालं त्यानंतर त्याच्या उद्घाटनाचा सोहळा होता. त्या सोहळ्याला महाराष्ट्राचे व देशाचे ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण हे उपस्थित होते. मी एक साधा आमदार म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्या धरणाचं उद्घाटन झालं आणि आपल्या भाषणामध्ये चव्हाण साहेबांनी सांगितलं की, पांडुरंगा तुझी चंद्रभागा आज आम्ही इथे अडवली अनेक वर्षे आम्ही पंढरीला तुझ्या दर्शनासाठी येतो, स्नान करतो व तुझं दर्शन घेतो. त्यासाठी आम्ही उन्हातान्हाचा दगड-धोंड्याचा विचार न करता श्रद्धेने या ठिकाणी येत असतो. तुझ्या दर्शनाने आम्हाला एक प्रकारचं समाधान हे मिळत असतं. आज या चंद्रभागेत आम्ही स्नान करतो ती चंद्रभागा आम्ही आज उजनीला अडवली. ती अडवली खरी पण त्याचा जो काही लाभ आहे हा आम्हा सगळ्यांना बघायला मिळणार आहे. तो कसा तर सोलापूर जिल्हा हा दुष्काळाचा जिल्हा. ही चंद्रभागा आम्ही इथे अडवली ती आम्ही इथे अडवली असली तरीसुद्धा या सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी शेतकऱ्याच्या शिवारामध्ये ती आम्ही पोहोचवली. ती पोहोचवल्यानंतर तिथे जे ज्वारीचं पिक घेतलं जाईल त्याच्या कणसामध्ये जो सोन्यासारखा, मोतीसारखा दाना भरेल त्यामध्ये पांडुरंगा तुझं दर्शन आम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यासाठी त्याचं मानसिक समाधान हे आम्हाला मिळेल त्या कष्टामुळे आणि या चंद्रभागाच्या पाण्याचा परिणाम आम्हाला काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसेल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एक प्रकारे समाजाला पुढे नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तेच काम या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केलं जातं.
आज सबंध देशामध्ये एका बाजूने सनातन धर्म आणि दुसऱ्या बाजूने भागवत धर्म यासंबंधीची चर्चा हल्ली मोठ्या प्रमाणात होत असते. मी एकच गोष्ट सांगतो की, आम्ही याकडे बघत असताना सामान्य माणसाच्या हितासाठी जपणूक करणारी जी विचारधारा आहे, समाजाला शक्तिशाली करणारी जी विचारधारा आहे आणि देशाला दुनियेतील कष्टकऱ्यांची आणि न्याय देणाऱ्यांची महासत्ता या भारताला बनवणारी जी विचारधारा आहे ती विचारधारा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आहे. ही विचारधारा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून युगान युगे मांडली जाते. त्यामुळेच हा देश आणि या देशातील समाज हा आजच्या काळात सुद्धा अनेक संकटे आली, आक्रमणे आली पण त्यावर मात करून मजबूतीने उभा राहिला म्हणून तोच विचार जतन करणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. तेच काम आज या ठिकाणी संमेलनाच्या माध्यमातून विचार देऊन करण्याचा प्रयत्न होतोय. संमेलनामध्ये पहिला भाग आता होतोय त्यानंतर आणखीनही काही भाग आहेत. माझी खात्री आहे की, या सगळ्यामध्ये जी विचारधारा या ठिकाणी मांडली जाईल ती समाजाला उपयुक्त असेल. समाजाला व नव्या पिढीला प्रोत्साहित करणारी असेल हे मोठं काम तुम्ही लोकांनी या ठिकाणी केलं.
