fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

पुणे शहरातील वाहतूक कोंडी त्वरित दूर करा मोहन जोशी यांची मागणी

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी प्रचंड त्रासदायक आहे. उत्सव काळात होणारी गर्दी आणि त्याकडे पोलिसांचा कानाडोळा यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्वत्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुणे शहरातील ही वाहतूक कोंडी त्वरित दूर करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.

पुण्यातील वाहतूक कोंडीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक व वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांना देण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नुरुद्दीन सोमजी, जया किराड, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.

मोहन जोशी यांनी दिलेल्या निवेदनात, यासंदर्भात त्वरित आढावा बैठक घेऊन पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी कोंडी होण्याच्या वेळी वाहतूक नियमनाची जबाबदारी वाहतूक शाखेतील सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी. यासाठी राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ), पोलीस आयुक्तालयातील ज्यादा कुमक, जवळील पोलीस स्टेशनचे कर्मचारी, महानगरपालिकेचे ट्राफिक वॉर्डन यांची कुमक मागवून घ्यावी. स्मार्ट सिटीतील ट्राफिक सिग्नल त्वरित कार्यान्वित करावेत. गणेशोत्सव काळात सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. कलावंताच्या सहकार्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जनजागृतीपर व्हिडीओ करावेत. उत्सव काळात स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो व महापालिकेतर्फे होणारी खोदकाम थांबवावीत. तसेच शहरातील जड वाहतुकीच्या संदर्भातल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोहन जोशी म्हणाले, “पुणे शहरातील वाहतूक कोंडी हा कळीचा मुद्दा आहे. शहरामध्ये वाहतूक नियमन कोलमडलेले आहे. आज पुणेकर नागरिकांना वेठीला धरले जात आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यावर आणि वाहतूक नियमन सुरळीत करण्यावर पोलिसांनी भर द्यावा. शहरातील वाहतूक कोंडी दूर न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: