fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

संगीताच्या राजहंसाला ‘हटके मानवंदना’

पुणे : शुक्रतारा मंद वारा…या चिमण्यांनो परत फिरा रे…आनंदाचे डोही आनंद तरंग… अशी अवीट गोडीची गीते सादर करीत श्रीनिवास खळे या संगीताच्या राजहंसाला हटके मानवंदना देण्यात आली. खळे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या वेगवेगळ्या लोकप्रिय संगीत रचनांचा उत्सव कार्यक्रमातून सादर झाला.

हटके म्युझिकल ग्रुप यांच्यावतीने ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना ‘हटके मानवंदना’ देण्यात आली. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल मधील गणेश सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख्य पाहुणे म्हणून संगीत नाटक व शास्त्रीय संगीतात मातब्बर असलेले रविंद्र घांगुर्डे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी यांची होती तसेच दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन शिरीष कुलकर्णी यांचे तर संगीत मार्गदर्शन निखिल महामुनी यांचे होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या ‘सुंदर ते ध्यान’ या संतवाणीने झाले. त्यानंतर सादर झालेल्या मंगेश पाडगांवकर लिखित ‘श्रावणात घननिळा बरसला’ या भावगीत आणि रसिकांवर स्वर वर्षाव केला.’लाजून हासणे अन हसून पहाणे’, ‘फुल ते संपले गंध ना राहिला’ या भावगीतांचे सादरीकरण रसिक श्रोत्यांना स्वरमयी काळात घेऊन गेले. ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’ हे खळे काकांचे अजरामर गीत शिरीष कुलकर्णी यांनी एकदम हटके पद्धतीत हॉर्मोनिका या पाश्चिमात्य वाद्य आणि शीळ-वादन या अनोख्या शैलीत पेश करून श्रोत्यांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात “जपून चाल – ग पोरी जपून चाल“ हे दुडक्या’चालीचे एक वेगळे गीत सुशांत कुलकर्णी यांनी लिलया सादर केले. शुक्रतारा मंद वारा’ या श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अरुण दाते यांनी गायलेल्या अवीट गोडीच्या भावगीताला संजीव करजगी आणि अनुराधा गोगाटे यांनी अतिशय सुंदरपणे सादर केले. अश्विनी आगाशे यांनी सादर केलेल्या ‘कळीदार कपूरी पान’ या लावणीला श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. निखिल महामुनी यांनी सादर केलेला ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’ या गीताला श्रोत्यांनी विशेष दाद दिली. एका ध्वनि-चित्रफीतीत, खळे काकांच्या अत्यंत प्रसिद्ध आणि प्रस्थापित “या चिमण्यांनो” या गीताचे निखिलजींनी दिलेल्या नवीन संगीताच्या प्रयत्नाचे, खळे काकांनी निखिलजींचे केलेले दिलखुलास कौतुक ऐकून श्रोते भाराऊन गेले.

शिरीष कुलकर्णी यांचे खुमासदार निवेदन आणि संगीतकार गायक निखिल महामुनी यांनी खळे काकांच्या सुमधूर गाण्यांच्या अनेक अपरिचित कथा,किस्से,गोष्टी सांगितल्यामुळे कार्यक्रम माहितीपूर्ण आणि उत्तरोत्तर रंगतदार होत गेला.

श्रीया महामुनी आणि ऋचा महामुनी यांनी सादर केलेल्या ‘गोरी गोरी पान’, ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ आणि ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ या गीतांनी रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या यशात जेष्ठ व्ह्ययॊलिन वादक चारुशीला गोसावी, सिंथेसाइज़रवर ओंकार पाटणकर, तबल्यावार अथर्व कागलकर, इतर हरहून्नरी हटके कलाकार दीपक थीटे, सुमित नगरकर, चंदूलाल तांबोळी यांचा महत्वाचा वाटा होता. निखिल महामुनी यांनी सादर केलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: