Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

भावनांवर विवेकाचा अंकुश ठेवायला स्त्रिया कधी शिकणार ? – मंगला गोडबोले

पुणे :- जीवनात विचाराला चकवा देणाऱ्या भावना जेव्हा प्रभावी ठरतात, तेव्हा ते वास्तव फार भीषण स्वरूप प्राप्त करते. भावनांवर विवेकाचा अंकुश ठेवायला स्त्रिया कधी शिकणार हा खरा मूळ प्रश्न आहे, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
 
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेतर्फे देण्यात येणारा कै. कृष्ण मुकुंद उजळंबकर स्मृती पुरस्कार आज प्रा. जास्वंदी वांबूरकर लिखित व सुनिधी पब्लिशर्सतर्फे प्रकाशित ‘इतिहास, स्त्रीवाद आणि विभावरी शिरूरकर’ या पुस्तकास ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मसाप, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. नलिनी गुजराथी, मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते
 
यावेळी बोलताना मंगला गोडबोले म्हणाल्या की, विभावरी शिरूरकर या वैचारिक दृष्ट्या उत्क्रांत होत गेलेल्या लेखिका होत्या.  बरेचदा संशोधन करताना संशोधक  अतिरेकी व्यक्तीवादावर भर देतात आणि त्याचा संशोधनावर विपरीत परिणाम होतो.  परंतु जास्वंदी वांबूरकर यांनी निरलसपणे हे संशोधन केलेले आहे. कारण संशोधन करताना व्यक्ती आणि त्याचा कालपट यांचा संबंध जोखणे महत्त्वाचे असते, ते त्यांनी अतिशय योग्य प्रकारे केले आहे. ज्या व्यक्तीला अभ्यासाची गोडी आणि त्याच्या थकव्यातून येणारा आनंद कळतो ती व्यक्ती कधीही थांबत नाही.
 
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, महाराष्ट्राला  ज्ञानोपासकांचा वारसा लाभलेला आहे. अशा महाराष्ट्रात  संशोधनाकडे अधिक काटेकोरपणे बघण्याची गरज निर्माण झाली आहे.  इतिहास हे समाजाचे सांस्कृतिक संचित असल्याने कोणत्याही विषयाचे संशोधन करताना त्याला इतिहासाची साक्ष द्यावीच लागते. गुणवत्ता हा सध्याच्या संशोधना संदर्भात चिंतेचा विषय झाला आहे. यासाठी आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय अभ्यासाचे समायोजन संशोधकांनी  करणे आवश्यक आहे. कोणताही विचार पुढे नेताना त्याचे मोठे मोल त्या त्या काळात मोजावे लागते. प्रगत समाजात स्त्रियांच्या संदर्भात आज घडणाऱ्या घटना अजूनही व्यापक समाज शिक्षणाची आवश्यकता विशद करतात. 
 
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना जास्वंदी वांबुरकर म्हणाल्या की, स्त्री आणि पुरुष या दोघांनी मिळून समाजाची बांधणी केली असताना स्त्रियांचा वेगळ्याने इतिहास मांडण्याची गरज पडणे ही बाब खरे तर मला थोडीशी निराशाजनक वाटते. कारण साहित्य इतिहास आणि संशोधन या दोन्हींमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचे स्थान समान आहे.
 
यावेळी डॉ. नलिनी गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक समितीच्या वतीने ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांनी मनोगत व्यक्त केले. 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी केले. सूत्रसंचालन मसापाचे कार्यवाह उद्धव कानडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading