मुंबईतील यू. एस कॉन्सुल जनरल माईक हॅन्की यांची सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भेट
पुणे – महाराष्ट्रातील पहिले कौशल्याधारित विद्यापीठ असलेल्या सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला (एसएसपीयु ) नुकतेच मुंबईतील यू. एसचे कॉन्सुल जनरल माईक हॅन्की यांनी भेट दिली. कौशल्य विकासाच्या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणे आणि भारत आणि यू. एस मधील संभाव्य भागीदारी करणे हा या भेटीमागील मुख्य उद्देश होता.
एसएसपीयुच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी कौशल्य विद्यापीठात श्री.हँके यांचे स्वागत करत कौशल्य विद्यापीठाची संकल्पना स्पष्ट केली. तसेच डॉ. स्वाती यांनी विद्यापीठाच्या ध्येयांविषयी आणि विद्यापीठातील विविध उपक्रमांविषयी बाबत माहिती दिली.सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीस पुणे आणि इंदोर ही भारतातील कौशल्य शिक्षण देणारी अग्रणीय विद्यापीठे आहेत. सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीस ह्या ७० टक्के प्रात्यक्षिके आणि ३० टक्के लेखी स्वरूपाच्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करतात.
या भेटीदरम्यान हँकी यांच्यासोबत मुंबईतील यू. एस कॉन्सुलेट जनरल एज्युकेशनच्या आउटरीचच्या संचालिका बेहरूज के.वाय. आवारी,यांनी विद्यापीठातील विविध स्किल् सेंटर्सला भेट दिली. तसेच उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि इंडस्ट्री ४.ओ मधील नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती घेतली. या प्रसंगी हँकी यांनी विद्यार्थ्यांशी आणि विद्यापीठातर्फे मोफत राबविण्यात येत असलेल्या इलेक्ट्रिक वाहने (EV), व औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्राचे कौशल्य प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांबरोबर संवाद साधला. एसएसपीयुतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे आणि विद्यापीठात शिकविल्या जाणाऱ्या कौशल्य अभ्यासक्रमांचे हँकी यांनी कौतुक केले.
एसएसपीयु मध्ये विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकी अंतर्गत समाजातील आर्थिकदृष्ट्या आणि उपेक्षित घटकांतील महिलांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या पिंपरी चिंचवड परिसरातील महिलांनी हँके यांना पंढरपूरच्या वारीशी निगडीत बोधवाक्य असलेली स्वतः तयार केलेली पिशवी भेट देण्यात आली.
या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये कौशल्य विकासासाठी अनेक नवीन मार्ग शोधण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच ज्ञान आणि कौशल्य देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याबाबत दोन्ही पक्षांनी आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले. नुकत्याच माननीय पंतप्रधानांच्या यू. एसच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि युनायटेड स्टेट्सने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. याच पार्श्ववभूमीवर माईक हॅन्की ह्यांची सदरील एसएसपीयुला भेट देणे हे भारत आणि यू. एस यांच्यातील कौशल्य विकासाच्या क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
