Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

विविधढंगी व्यक्ती साकारलेले  ‘चेहरे’ चित्रप्रदर्शन

पुणे : पांढऱ्याशुभ्र कॅनव्हासवर रेखाटनाच्या माध्यमातून साकारलेली विविध चित्रे… चेहऱ्यावरचे बारीक भाव…हास्य, शौर्य, दुःख, आनंद या भावना अतिशय तरलपणे रेखाटलेली चित्रे ‘चेहरे’ या चित्रप्रदर्शनात पुणेकरांना पहायला मिळाली. एपीजे अब्दुल कलाम, रजनीकांत, आईन्स्टाईन, नरेंद्र मोदी, आचार्य अत्रे, यांसह २५० दिग्गजांची रेखाचित्रे प्रदर्शनात  लावण्यात आली आहेत.

चित्रकार दत्तात्रय वेताळ यांचे ‘चेहरे’ हे पेन्सिल व्यक्तिचित्र प्रदर्शन  बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.न.म.जोशी, ज्येष्ठ चित्रकार मुरलीधर लाहोटी, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष  किरण सरोदे,पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद शेलार नू.म. वि. शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर, नूमवि चे चित्रकला विभाग प्रमुख दत्तात्रय वेताळ, पर्यवेक्षक देवराम चपटे यावेळी उपस्थित होते.

न. म. जोशी म्हणाले, चित्रकार हे जगण्यातील श्रेयस आणि प्रेयस  टिकून ठेवायचे काम करतात. आजच्या काळात सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा ऱ्हास सुरू झाला आहे, अशी स्थिती सगळीकडे दिसून येते. अंतकरणात डोकाविण्याची वृत्ती कमी झाली आहे. कला ही आतून बघावी लागते.  जीवनातील उदात्त टिकून ठेवणारे चित्रकार हे प्रकाशाची बेटे ठरतात, असेही त्यांनी सांगितले.

प्रमोद कांबळे म्हणाले, कोणत्याही कलेचा रियाज आवश्यक आहे. एका रात्रीतून कला मोठी होत नाही, त्यासाठी सातत्य गरजेचे असते. पेन्सिल हे माध्यम दिसायला सोपे दिसते पण ते तितकेच अवघड आहे त्यासाठी सराव आवश्यक आहे. पराग ठाकूर, विवेक खटावकर यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड.शिरीष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. इंग्रजीच्या अध्यापिका  वंदना वेताळ यांनी आभार मानले.

या प्रदर्शनात आपल्याला चित्रपट क्षेत्राबरोबरच उद्योग, कला, क्रीडा, संगीत, शैक्षणिक व ऐतिहासिक अशा विविध क्षेत्रातील प्रख्यात व  सुप्रसिद्ध  व्यक्तिमत्त्व व त्यांचे चेहरे ( पेन्सिल रेखाटन) पहावयास मिळणार आहेत. बुधवार दिनांक २१ जून पर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading