मानवताधर्माची पताका घेऊन विठ्ठल गायकवाड यांचे कार्य : डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे : स्वार्थापोटी पुढाऱ्यांच्या बॅगा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण झालेली एकीकडे पहायला मिळते तर दुसरीकडे विठ्ठल गायकवाडसारखा कार्यकर्ता जात-धर्म याचा विचार न करता मानवताधर्माची पताका खांद्यावर घेऊन वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
आडकर फौंडेशन आणि महाराष्ट्र कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांचा 61व्या वाढदिवसानिमित्त सत्कार व रमाईपुत्र पुरस्काराने डॉ. सबनीस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 15) गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. शाल आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, महाराष्ट्र कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, माजी नगरसेविका लता राजगुरू, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, दीपक पायगुडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. विठ्ठल गायकवाड यांच्या मातोश्री तुळसाबाई गायकवाड यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
पुढारी, विचारवंत, श्रीमंतांचे सत्कारसोहळे आपण पाहिले आहेत; पण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा साहित्य परिषदेच्या सभागृहात सत्कार होत आहे ही उल्लेखनीय बाब असल्याचे नमूद करून डॉ. सबनीस म्हणाले, राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्यांचा वापर होताना दिसतो; पण विठ्ठल गायकवाड कार्यकर्ता म्हणून जे कार्य करीत आहे ही गोष्ट अनुकरणीय आहे. त्यामुळे विठ्ठल खऱ्याअर्थाने कृतिशील विचारवंत आहे. कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर मानवतावादाच्या चळवळी चालतात त्या अधिक मोठ्या व्हाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना विठ्ठल गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमामाई यांच्या प्रेरणेने मानवतावादी विचार घराघरात पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. समाजकार्य करताना मला प्रत्येकामध्ये बाबासाहेब आणि रमाई दिसते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उद्धव कानडे यांनी केले.
