Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

जात धर्माच्या सीमा ओलांडणारी कविता सर्वश्रेष्ठ- लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत 

पुणे : आजच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण  लिहिलेला प्रत्येक शब्द, गोष्ट त्वरित सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते. अशा वेळी लेखक आणि कवींची जबाबदारी मोठी आहे. कवीने समाजाला शहाणे करायचे असते, जात आणि धर्माच्या सीमा ओलांडून समाजासाठी मार्गदर्शक ठरणारी कविता ही सर्वश्रेष्ठ असते, असे मत ज्येष्ठ लेखक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.
वल्लरी प्रकाशनतर्फे व्यंकटेश कल्याणकर संपादित चाफा या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, साहित्यिका मानसी चिटणीस, वल्लरी प्रकाशनाचे व्यंकटेश कल्याणकर, वक्ते डॉ. सुनील धनगर यावेळी उपस्थित होते. तर किरण इनामदार, प्रकाश तांबे, महेश कुलकर्णी कीर्ती देसाई, ज्योती इनामदार यावेळी उपस्थित होते.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, कवीने इतरांचे अनुकरण न करता शब्द आणि प्रतिभेचे जे वरदान आपल्याला मिळाले आहे त्याला साहित्याचे कोंदण देऊन समाजाला दृष्टिकोन आणि जगण्याची उमेद दिली पाहिजे.

कविता किंवा साहित्य हे केवळ मनोरंजन नव्हे तर त्या पलीकडे जाऊन जीवनाचा दृष्टिकोन देणारी एक तपस्या आहे. ही तपस्या सर्वांनाच प्राप्त होते असे नाही. इतरांच्या अनुभवाने किंवा दृष्टीने जग न पाहता कवीने आपल्या अनुभवातून कविता निर्माण करावी आणि त्यातून जग अनुभवण्याचा आनंद दिला पाहिजे.

उद्धव कानडे म्हणाले, कवींना विशेषतः ग्रामीण भागातील कवींना व्यासपीठ मिळवून देणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कवितेवर केवळ बोलू नये तर त्याचा आनंद घेतला पाहिजे कविता ही माणसाला आत्ममग्न करते. कवीने आपल्याला मिळालेल्या प्रतिभेला साधनेची जोड दिली तर त्यातून निश्चितच चांगल्या प्रकारची साहित्यकृती निर्माण होऊ शकते.

गौरी रत्नपारखी म्हणाल्या. कविता ही स्वतःच्या सुखासाठी नव्हे तर समाजासाठी असते. कविता समाजासमोर आली तर कवीच्या प्रतिभेला अधिक बहर येतो. त्यातून कवीचा आत्मविश्वास वाढतो.

नीता चिकारे, प्राची जोशी, शरद करमरकर, मुकुंद काजरेकर, गोपाल खंडारे, ज्योती मनोहर, अभिषेक मिटके, शिरीष पदकी, प्रवीण पाटील, पूर्वा पित्रे, अतुल सानप, शारदा शेंबवणेकर, रचना वसेकर, गिरीश वसेकर या प्रतिभावंत कवी कवयित्रींचा “चाफा” हा काव्यसंग्रह आहे. प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. मानसी चिटणीस यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading