प्रगत तंत्रज्ञानाला समाजभानाची जोड द्या ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांचे मत
पुणे – डोळ्यांच्या उपचारासाठी आज वैदयकिय क्षेत्रात खूप प्रगत तंत्रज्ञान आले आहे. रुग्ण आणि नातेवाईक आपल्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे आपले काम करीत असताना कितीही अडचणी आल्या तरी न थांबता त्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तंत्रज्ञान प्रगत असले तरी त्याला समाजभानची जोड असली पाहिजे. तर सर्वसामान्य आणि गरजूंवर चांगले उपचार करता येतील, असे मत ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांनी व्यक्त केले.
आम्ही पुणेकर व साई सामाजिक सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रसेवा तपस्वी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉ. श्रीकांत केळकर, डॉ. ललित शहा आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभाग, पुणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. घोले रोडवरील नॅशनल इन्स्टिट्यूट अॉफ ऑफथमॉलॉजी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आय.एम.ए. महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, शारदा विद्यापीठम् चे पं. वसंत गाडगीळ, ॲड. दिलीप हांडे, आम्ही पुणेकरचे अध्यक्ष हेमंत जाधव, साई सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास काबरा, अखिल झांजले, संजय लढ्ढा, हर्ष भूतडा, सुभाष सुर्वे, प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते.
डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, पुणे शहरात नॅशनल इन्स्टिट्यूट अॉफ ऑफथमॉलॉजी सारखे मोठे आणि सुसज्ज असे हाॅस्पिटल उभे करणे म्हणजे एक तपच आहे आणि ते केळकर यांच्या सारखा तपस्वी व्यक्तीच करू शकतो. त्यांनी फक्त दृष्टीदानेचे कार्य केले नाही तर अनेक सक्षम विद्यार्थी देखील घडविले आणि आजही घडवत आहेत, असेही त्यांनी सांगितले. हेमंत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. पं.वसंत गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. उत्तम मांढरे यांनी आभार मानले.
