Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

नैतिक मुनलाईटिंग करण्यात गैर नाही; रेझूमेक्सतर्फे आयोजित परिसंवादात तज्ज्ञांचे मत

पुणे  – आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अनेक अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कंपनीच्या वेळेच्या व्यतिरिक्त इतर कंपन्यांसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करत असतात. असे काम करण्यामध्ये काहीही गैर नाही. त्यामुळे अशाप्रकारे नैतिक मुनलाईटिंगच्या कामाला आयटी कंपन्यांनी प्रोत्साहनच दिले पाहिजे. असे मत आयटी कंपन्यांमधील अनेक तज्ञ व्यक्तींनी रेझूमेक्सतर्फे आयोजित परिसंवादामध्ये व्यक्त केले.

रेझूमेक्स संस्थेतर्फे “नैतिक मूनलाइटिंग” या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये पुण्यासह विविध शहरातील आयटी कंपन्यांमध्ये तज्ञ सहभागी झाले होते. रेझूमेक्सचे संस्थापक संचालक विनायक जोगळेकर, एक्सेला टेक्नॉलॉजीजमधील डेटा सायन्स आणि एआयचे ग्लोबल हेड आकाश मावळे, एट्रेड मेनलोपार्क येथील अँग्युलर आर्किटेक्ट जय पाठक, कनका सॉफ्टवेअरचे सीईओ अनिरुद्ध परांजपे, क्लाउडरीचचे प्रमुख सॉफ्टवेअर अभियांत्रिकी व्यवस्थापक जॉन्सन अब्राहम, ऍपटवेअर आणि ऍपमार्टचे संस्थापक आणि सीईओ हरीश रोहोकले, कास्ट.एआयचे संस्थापक तांत्रिक अभियंता रोनक पाटील, यज्ञ आयक्यू इंकचे सह-संस्थापक आणि सीटीओ मनीष अग्रवाल, आय.बी.एम. मधील प्रोजेक्ट मॅनेजर श्रेया ठोंबरे, स्प्लेंडरनेट टेक्नॉलॉजीजचे सीईओ प्रताप श्रोत्रिय, सायबर सिक्युरिटीचे संचालक, क्लाउड, एन्कोरा किरण रत्नाकर, मायक्रोलायझ येथील सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख सलील खेडकर उपस्थित होते.

मूनलायटींगमध्ये गुंतलेल्या कर्मचार्‍यांची ओळख लॉक करण्यासाठी एन.एफ.टी.प्रणाली विकसित करण्याची कल्पना रेझूमेक्सतर्फे यावेळी मांडण्यात आली. याशिवाय, जेंव्हा एक कर्मचारी दोन कंपन्यांसाठी काम करत आहे. त्यावेळी दोन्ही कंपन्यां आणि कर्मचाऱ्याचे हित अबाधित राहावे यासाठी मुनलाईटिंग काम करण्यासंदर्भात संबंधितांमध्ये त्रि-मार्गी स्मार्ट करार करण्यात यावा अशी सूचना या परिसंवादामध्ये प्रस्तावित करण्यात आली. कर्मचारी मूनलायटींगचा विचार का करतात? यावर देखील चर्चा करण्यात आली. क्षमतांचा कमी वापर, अर्थार्जन आणि निष्क्रिय वेळ यांचा समावेश या चर्चेत झाला. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे या विषयावर आणखी कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

विनायक जोगळेकर यावेळी म्हणाले, आयटी कंपनीमधील उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचारी ज्या कंपनीमध्ये काम करत आहेत, आपल्या बुद्धीचा आणि कलेचा इतर कंपन्यांसाठी वापर करणे योग्य आहे. तसेच इतर कंपन्यांसाठी काम करण्यात काहीही चुकीचे नाही यावर जोगळेकर यांनी प्रकाश टाकला.

आकाश मावळे म्हणाले, दोन्ही कंपन्यांचे हित लक्षात घेऊन मून लाइटिंगचा दोन्ही कंपन्यांना कसा अधिकाधिक फायदा होण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये योग्य व्यवस्थापन आणि नैतिक मार्गदर्शन तत्वांचे पालन झाले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. यासाठी कंपन्यांमधील स्पर्धा, करार, योग्यता आणि संघर्ष यांची निश्चित मांडणी केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सुचवले.

जय पाठक म्हणाले, इतर कंपन्यांसाठी मूनलाइटिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये विशेष कौशल्य असतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचा उपयोग करून कंपन्या आपले प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करू शकतात. याविषयीचा त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. मूनलायटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अनिरुद्ध परांजपे म्हणाले, वेळेत काम होण्याबरोबर ग्राहकांचे समाधान करणे हे कोणत्याही कंपनीचे उद्दिष्ट असते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्याकडून नैतिक मुनलाईटिंगचे काम करून घेणे योग्यच आहे यावर त्यांनी भर दिला.
जॉन्सन अब्राहम म्हणाले, कंपनीची स्वायत्तता, कर्मचाऱ्यांच्या वेळेचे व्यवस्थापन, यासारख्या गुणांच्या विकासासह मूनलायटींगच्या सकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकला.मुनलाईटिंग हे वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी तसेच तांत्रिक कौशल्य वाढीसाठी कसे योगदान देऊ शकते यावर त्यांनी भर दिला.

हरीश रोहोकले यांनी मूनलाइटिंगबद्दल चिंता व्यक्त करताना क्लायंट कोडची गोपनीयता, उत्पादकता समस्या आणि सुरक्षितता या संभाव्य त्रुटी यावर चर्चा केली. त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये कर्मचार्यांसाठी एक मॉडेल तयार केले आहे. हे मॉडेल कंपनीतल्या प्रोजेक्टद्वारे कमावण्यास आणि शिकण्यास अनुमती देते व मूनलायटींगला पर्याय निर्माण करते.

रोनक पाटील म्हणाले, पुणे आणि बंगळुरू सारख्या महागड्या शहरांमध्ये कमी पगारावर काम करणाऱ्यांसाठी मूनलायटींग ही अधिक पैसे कमविण्याची संधी आहे.

मनीष अग्रवाल म्हणाले, मूनलायटींग करण्यापेक्षा फ्रीलांसिंग किंवा सल्लागार म्हणून काम करण्याची सूचना करत त्यांनी मुनलाईटिंगला विरोध केला. कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या कामाच्या नियमित तासांच्या पलीकडे असतात. कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक वेळ, झोप आणि प्राथमिक नोकरीवरील एकाग्रतेवर होणाऱ्या संभाव्य नकारात्मक परिणामाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

श्रेया ठोंबरे म्हणाल्या, मूनलाइटिंगला परवानगी दिल्याने उद्भवू शकणार्‍या जोखमी बरोबर नोकरीमधील स्वारस्य गमावून कर्मचारी अधिकाधिक असमाधानी आणि दुःखी होतील. त्यांनी प्राथमिक कंपनीशी एकनिष्ठेला उच्च मूल्य देऊन मूनलायटींगला विरोध केला.

प्रताप श्रोत्रिय यांनी कंपनी आणि कर्मचारी दोघांचेही दृष्टिकोन मांडले. कर्मचार्‍यांच्या दृष्टीकोनातून, त्यांनी काम हे केवळ अर्थार्जनाचे साधन नसून त्यातून मिळणाऱ्या मानसिक समाधानाचे महत्त्व अधोरेखित केले.

किरण रत्नाकर यांनी मूनलायटींगमधून मिळालेल्या अतिरिक्त ज्ञानाचे प्राथमिक कंपनीला होणारे फायदे त्यांनी अधोरेखित केले. कंपनीकडून पूर्वपरवानगी घेऊन केलेल्या मूनलायटींगचा अनुभव कथन केला.

सलील खेडकर यांनी योग्य मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांसह मूनलायटींग उपक्रमांना परवानगी देण्याची शिफारस केली. एक प्रतिभावान कर्मचारी आणि कंपनीची भरभराट करण्यासाठी नैतिक मूनलायटींगचे समर्थन त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading