गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या – नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आजच्या सरकारच्या काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरु आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरु आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत? शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते ते खरेच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने १९ मे रोजी या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत आणि महिला सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. पण दुर्देवाने या संदर्भात काहीच कारवाई होताना दिसत नाही. गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे पण सरकार केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये व्यस्त आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. फडणवीस यांच्याकडे गृह खात्याबरोबरच अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण, राजशिष्टाचार अशा सहा विभागांचा कारभार असून सहा जिल्ह्यांचे ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते गृह विभागाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. फडणवीस यांच्याकडील गृहखाते तात्काळ काढून घ्यावा आणि राज्याला अनुभवी, सक्षम व पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा असे पटोले म्हणाले.
