Thursday, June 4, 2026
BusinessLatest NewsPUNE

भविष्यात भारत असेल ‘वर्ल्ड क्लास ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग बेस’ अवजड उद्योग मंत्रालयाचे सहसचिव विजय मित्तल यांचे मत

पुणे : स्थानिक स्तरावरील ग्राहकांची मोठी संख्या, स्वदेश इंजिनिअरिंग क्षमता व सरकारच्या अनुकूल धोरणांच्या जोरावर भारत ‘वर्ल्ड क्लास ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग बेस’ म्हणून पुढे येऊ शकतो, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचे सहसचिव विजय मित्तल यांनी व्यक्त केले.

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)च्या वतीने आणि एसएई इंडिया व एएसएम इंटरनॅशनल, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मागील तीन दिवस होमोलोगेशन टेक्नॉलॉजी सेंटर (एआरएआय-एचटीसी), चाकण येथे सुरु असलेल्या ‘ऑटोमोटिव्ह मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग’ (एएम अँड एम २०२३) या विषयावर आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाहवा मेटलटेक प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार पाहवा, अशोक लेलँडचे मुख्य तांत्रिक अधिकारी व एआरएआयचे उपाध्यक्ष डॉ. एन सरवानन, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई आणि एआरएआयच्या वरिष्ठ उपसंचालिका व परिषदेच्या समन्वयक मेधा जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजय मित्तल म्हणाले की,  “गेल्या काही वर्षात भारतीय वाहन उद्योग क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने वाढणारा प्रमुख ऑटो बाजार म्हणून पुढे आले आहे. वाहन उद्योग क्षेत्रात देशात रोजगाराच्या देखील मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच, मॅग्नेशियम व इतर मटेरियल्सचा वापर करून सुरक्षित व हरित गतीशिलता उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. स्थानिक उत्पादनांमध्ये वाढ,  ई मोबिलिटीला प्रोत्साहन यासाठी सरकारी योजनांद्वारे प्रयत्न केला जात असल्याची माहिती देखील यावेळी मित्तल यांनी दिली.

आतापर्यंत वाहन तंत्रज्ञानासाठी पाश्चिमात्य देशांकडे पाहिले जायचे. मात्र, आता इंजिनिअरिंग, मॅन्यूफॅक्चरिंग व गुणवत्ता याबाबत भारत पुढे येत असून, भविष्यात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत सर्वात आघाडीवर असेल, असे प्रतिपादन ललित कुमार पाहवा यांनी यावेळी केले.

‘’वर्ष २०३० पर्यंत वाहनात वापरल्या जाणाऱ्या इंधनात मोठा बदल पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांकडे लोकांचा कल वाढला असून, हायड्रोजनवर आधारित आयसीई इंजिन, मिथेनॉल, इथेनॉलचा वापर देखील भविष्यात केला जाईल’’, असे सांगत डॉ एन. सरवानन म्हणाले की,  ‘’मटेरियल उत्पादन, डिझाईनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. वाहने वजनाला हलकी व सुरक्षित करण्यामध्ये मटेरियल्सचा महत्त्वाचा वाटा आहे.’’

दरम्यान, या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वाहन क्षेत्रातील विविध कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांनी ऑटोमोटिव्ह मटेरियल्स संदर्भातील केलेल्या संशोधन व तंत्रज्ञानाबाबत स्टॉल्सचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. परिषदेच्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेजी मथाई यांनी केले. तर मेधा जांभळे यांनी उपस्थितांच्या आभार मानले. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तब्बल ४४ संशोधनात्मक पेपर्स सादर करण्यात आले. यातील मटेरियल, मॅन्यूफॅक्चरिंग प्रोसेसेस, कॅरेक्टराईझेशन व अॅनॅलिसिस  , मॉडेलिंग व सिम्यूलेशन या विभागात सर्वोत्तम संशोधनात्मक पेपर्स सादर करणाऱ्यांना पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading